शासकीय रुग्णालयातील स्वच्छतेचा बोजवारा!स्वच्छतागृहात पाण्याचे साम्राज्य; घाण, कचरा अन् दुर्गंधीने!

शासकीय रुग्णालयातील स्वच्छतेचा बोजवारा!

स्वच्छतागृहात पाण्याचे साम्राज्य; घाण, कचरा अन् दुर्गंधीने रुग्ण-नातेवाईक त्रस्त

टॉयलेट-बाथरूममध्ये पाय घसरून अपघाताची भीती; वरिष्ठांचे दुर्लक्ष कधी संपणार?

धाराशिव : धाराशिव येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. रुग्णालयातील काही स्वच्छतागृहांमध्ये पाणी साचलेले दिसून येत असून, टॉयलेट अथवा बाथरूमचा वापर करताना पाय घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी परिस्थिती रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे.

स्वच्छतागृह परिसरात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने फरशीवर मोठ्या प्रमाणात ओलावा व घाण दिसून येत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे विशेषतः वृद्ध रुग्ण, महिला, लहान मुले तसेच अशक्त अवस्थेतील रुग्णांसाठी धोका निर्माण होऊ शकतो.

कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी अन् अस्वच्छ वातावरण!

रुग्णालयाच्या विविध ठिकाणी कचरा पडलेला दिसत असून, वेळेवर स्वच्छता होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य मिळणे अपेक्षित आहे, त्याच ठिकाणी घाणीचे प्रमाण अधिक आणि स्वच्छता कमी असल्याचे दिसून येत आहे.

रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्याबरोबरच स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणेही तितकेच आवश्यक आहे. मात्र स्वच्छतागृहांची अवस्था पाहता रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

प्रशासनाने तातडीने पाहणी करून कारवाई करावी

स्वच्छतागृहांची तातडीने स्वच्छता करणे, साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, फरशा नियमितपणे स्वच्छ व कोरड्या ठेवणे, कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावणे तसेच दुर्गंधी निर्माण होणार नाही यासाठी नियमित स्वच्छता व्यवस्था राबविणे गरजेचे आहे.

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वरिष्ठ प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन संपूर्ण रुग्णालय परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

रुग्णालय उपचारासाठी असते; अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होणे ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता प्रशासन जागे होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!