कळंबच्या राजकारणाला मोठा धक्का; ठाकरे गटाचे ९, काँग्रेसचा १ नगरसेवक भाजपच्या गोटात
सोलापूर येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; कळंब नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे बदलणार
कळंब : कळंब नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, ठाकरे गटाचे ९ आणि काँग्रेसचा १ अशा एकूण १० नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सोलापूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश झाला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरे गटाचे गटनेते नगरसेवक संजय मुंदडा, जमील मंहमद कासीम खाटीक, इंदुमती जयनंदन हौसलमल, रुकसाना चाँदसाब बागवान, वनमाला शंकर वाघमारे, आशाताई सुधीर भवर, ज्योतीताई दीपक हाटकर, सफुरा शकील काझी, सागर सुभाष मुंडे आणि काँग्रेसच्या अर्चनाताई प्रताप मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या सामूहिक पक्षप्रवेशामुळे कळंब नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, भाजपची संघटनात्मक ताकद वाढली आहे. विविध पक्षांतील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी काळातील कळंबच्या राजकारणात भाजपची भूमिका अधिक प्रभावी होण्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपच्या नेतृत्वावर आणि विकासाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत हा प्रवेश करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाला बळ देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.