‘आपला जीव, धाराशिव व्हिजन २०३०’च्या होर्डिंगवरून महायुतीत नाराजी!
आमदार तानाजीराव सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो नसल्याने जिल्हा परिषद सदस्य सविता तळेकर यांचा कार्यक्रमावर बहिष्कार
‘लोकप्रतिनिधींचा अवमान सहन करणार नाही’; होर्डिंगवरील फोटो न लावल्याचा निषेध
धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषदेच्या वतीने आज धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आपला जीव, धाराशिव व्हिजन २०३०’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर शिवसेनेचे नेते तथा माजी आरोग्यमंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो नसल्याने जिल्हा परिषद सदस्य सौ. सविता विकास तळेकर यांनी नाराजी व्यक्त करत कार्यक्रमाचा निषेध केला असून, कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले आहे.
याबाबत बोलताना सौ. सविता विकास तळेकर, जिल्हा परिषद सदस्य, धाराशिव पारगाव गट यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार तानाजीराव सावंत तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांचे छायाचित्र होर्डिंगवर असणे अपेक्षित होते. मात्र, कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर त्यांचे फोटो नसल्याने आपण या प्रकाराचा निषेध करीत असून कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
‘धाराशिव व्हिजन २०३०’ हा जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाचा आराखडा मांडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात असताना, त्याच्या आयोजनावरूनच लोकप्रतिनिधींच्या फोटोवरून निर्माण झालेली नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे. विकासाच्या कार्यक्रमात सर्व लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान व स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.