विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत ग्रामीण प्रशाला, माडजचे घवघवीत यश; विजेत्या विद्यार्थ्यांचा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते गौरव.

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत ग्रामीण प्रशाला, माडजचे घवघवीत यश; विजेत्या विद्यार्थ्यांचा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते गौरव.

धाराशिव, दि. २३ जुलै : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित 'विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा–२०२६' मध्ये उमरगा तालुक्यातील ग्रामीण प्रशाला, माडज येथील विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव व पारितोषिक वितरण समारंभ आज जिल्हा परिषद, धाराशिव येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी विश्वकोशाची ओळख निर्माण होणे, सामान्यज्ञान वृद्धिंगत होणे आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शहरी व ग्रामीण अशा दोन विभागांत पार पडली. ग्रामीण विभागातून ग्रामीण प्रशाला, माडज येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा व तालुकास्तरावर मानाचे स्थान पटकावले.

या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. श्रीम.सुधा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

जिल्हास्तरीय स्पर्धेत समर्थ नंदकुमार जाधव यांनी प्रथम, प्रतिक विठ्ठल भोसले यांनी द्वितीय, तर प्रतीक्षा बाळू फुगटे हिने तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्यांना अनुक्रमे रु. ३,०००/-, रु. २,०००/- व रु. १,०००/- रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

तालुकास्तरीय स्पर्धेत ऋतुजा तानाजी शहापुरे, निकिता नवनाथ सूर्यवंशी व ईश्वर शिवशरणाप्पा कुंभार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवित उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना नियमानुसार रोख पारितोषिक रु. एक हजार पाचशे प्रत्येकी, प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ज्ञानाधारित स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते तसेच अभ्यासाविषयीची आवड वाढीस लागते, असे सांगितले. भविष्यातही जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या यशामागे उपक्रमशील शिक्षक डॉ. बालाजी मदन इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा.श्री दिनकर होळकर ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री भारत देवगुडे, वेतन अधीक्षक श्री परतापुरे, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!