धाराशिवमध्ये ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
भवानी चौकातील आरोग्य शिबिरात ११२ रुग्णांची तपासणी; औषधोपचारासह आरोग्यविषयक मार्गदर्शन
धाराशिव : वैद्यकीय शिक्षण व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत मध्यवर्ती श्री भवानी गणेश मंडळ, भवानी चौक, सांजा रोड, धाराशिव येथे २५ सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मा. अधिष्ठाता डॉ. वीणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचकर्म विभाग प्रमुख डॉ. सचीन टिके यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडले. सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात एकूण ११२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले, तसेच आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक प्राध्यापक डॉ. अतुल गोपनारायण, पदव्युत्तर विद्यार्थी व आंतरवासीय विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदविला. तसेच डॉ. सोमेश व्हर्के, डॉ. प्रियंका सिंग, डॉ. हर्षदा आणि मिश्रक श्री. महाजन यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.
आरोग्य तपासणी, औषधवाटप आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने परिसरातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ झाला.