मांडवा येथे तिरट जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धाड

मांडवा येथे तिरट जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धाड

एलसीबी पथकाची धडाकेबाज कारवाई; १७.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त, २२ जण ताब्यात

मांडवा : वाशी तालुक्यातील मांडवा गावातील पारधी पेठ परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत २२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल व वाहनांसह एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५ सप्टेंबर रोजी वाशी पोलीस ठाणे हद्दीतील मांडवा गावातील पारधी पेठ येथे तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर ठिकाण संवेदनशील असल्याने कारवाईचे आव्हान लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला.

त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत जुगार खेळणाऱ्या २२ जणांना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान २ लाख ४६ हजार ६०० रुपये रोख, जुगाराचे साहित्य, १५ मोबाईल फोन तसेच चारचाकी वाहनांसह एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन आरोपींवर स्वतंत्र गुन्हे दाखल

या कारवाईतील आरोपींपैकी संतोष रमेश काळे (रा. मांडवा) याच्यावर यापूर्वीच्या १४ गुन्ह्यांत पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच अनंत कालिदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी, पोस्ट वाशी) याच्यावरही वाशी पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पथकाच्या कारवाईमुळे अवैध जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके तसेच पोलीस कर्मचारी विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, दत्ता राठोड, दया गाडेकर, अशोक ढगारे, योगेश कोळी, चापोशी मेहबूब अरूख, चापोशी केदार व आरएसपी/क्यूआरटी पथकातील अंमलदार यांनी केली.

या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!