ढोकी-तडवळा परिसरात मटक्याच्या चर्चेने नागरिकांत चिंता!
पानटपऱ्या, हॉटेल्स व दुकानांच्या आडून मटका सुरू! असल्याच्या तक्रारी; तरुण पिढी व कुटुंबांवर परिणाम होण्याची भीती
ढोकी : ढोकी गावातील सोसायटी गोडाऊन परिसर, बसस्थानक परिसर तसेच पेट्रोल पंप व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पानटपऱ्या, हॉटेल्स आणि काही दुकानांच्या आडून खुलेआम मटका घेतला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. याबाबत परिसरात नागरिकांमध्ये चर्चा व कुजबुज सुरू असून, संबंधित ठिकाणी नेमका प्रकार काय आहे, याची पोलिस प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
ढोकीतील काही भागांमध्ये टपऱ्या व हॉटेल्सच्या माध्यमातून मटक्याचे व्यवहार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः तरुण वर्ग तसेच रोजंदारीवर काम करणारे नागरिक अशा प्रकारच्या जुगाराच्या आहारी जाण्याची शक्यता असल्याने याचा थेट परिणाम कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कसबे तडवळे येथील बसस्थानक परिसरातील काही हॉटेल्समध्ये मटका घेतला जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच तडवळा गावातील प्रमुख बाजारपेठ परिसरात हॉटेल व टपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका चालत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आसपासच्या गावांमधून काही जण मटका खेळण्यासाठी तडवळा येथे येत असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे.
‘मटका’च्या आहारी जाणाऱ्या कुटुंबांची चिंता
मटक्यासारख्या जुगारामुळे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता असते. सुरुवातीला किरकोळ पैशांपासून सुरू होणारा जुगार पुढे मोठ्या आर्थिक नुकसानीचे कारण ठरू शकतो. त्यामुळे तरुण पिढीला अशा प्रकारापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.
पोलिस प्रशासनाने केवळ चर्चा न ठेवता सत्यता तपासावी
ढोकी आणि तडवळा परिसरात मटका सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी व चर्चांची पोलिस प्रशासनाने स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणावी. जर अवैध जुगार सुरू असल्याचे आढळून आले तर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच अशा प्रकारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.