५० किलोच्या पोत्यात ३५ किलो तांदूळ? शिक्षण विभागांला माहिती नाही का झोपेचा सोंग

५० किलोच्या पोत्यात ३५ किलो तांदूळ?

शालेय पोषण आहाराच्या धान्य वाटपावर गंभीर प्रश्न; धाराशिव नगर परिषद शाळा क्र. ८ मधील प्रकाराने खळबळ

तांदळाच्या पोत्यांचे वजन केल्यानंतर नागरिकांचा दावा; काही पोत्यांमध्ये १० ते १२ किलोपर्यंत तफावत असल्याचे निदर्शनास

धाराशिव (सय्यद कलीम मुसा) : धाराशिव शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक ८ येथे शालेय पोषण आहारासाठी करण्यात आलेल्या तांदळाच्या पुरवठ्यावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिसरातील काही नागरिकांनी शाळेत आलेल्या तांदळाच्या पोत्यांचे वजन करून पाहिल्यानंतर काही पोत्यांमध्ये अपेक्षित वजनापेक्षा तब्बल १० ते १२ किलोपर्यंत तांदूळ कमी असल्याचे आढळून आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या धान्य पुरवठ्याची संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही पोत्यांवर ५० किलो वजनाचे लेबल लावण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष वजन केल्यानंतर काही पोत्यांमध्ये ३८ किलो, ४० किलो, तर काही पोत्यांमध्ये अवघा ३५ किलो तांदूळ असल्याचे आढळून आले. काही पोत्यांवर वजनाचे लेबल नसल्याचे, तर काही पोती छेद पडलेली अथवा खराब अवस्थेत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

‘गोडाऊनमधून जसा माल आला, तसाच दिला’

या प्रकाराबाबत नागरिकांनी संबंधित वाहनचालकाकडे विचारणा केली असता, “गोडाऊनमधून जसा माल आला, तसाच आम्ही येथे देत आहोत,” असे उत्तर मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले. संबंधित पुरवठादार अथवा ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

शासनाच्या योजनेत धान्याचे प्रमाण निश्चित

शालेय पोषण आहार योजना आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM POSHAN) या नावाने राबविण्यात येते. केंद्र शासनाच्या निकषांनुसार प्राथमिक स्तरावर प्रति विद्यार्थी प्रतिदिन १०० ग्रॅम खाद्यान्न, तर उच्च प्राथमिक स्तरावर १५० ग्रॅम खाद्यान्न देण्याचे प्रमाण निश्चित आहे.

महाराष्ट्र शासनाच्या १८ जून २००९ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत अधिकृत शिक्षण विभागाच्या माहितीत ग्रामीण भागातील शाळांना धान्यादी मालाचा पुरवठा आणि शहरी भागातील तांदळाच्या वाहतुकीची स्वतंत्र व्यवस्था नमूद करण्यात आली आहे. नागरी भागात ही योजना केंद्रीय स्वयंपाकगृहाच्या माध्यमातून राबविली जाते.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या २३ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या शासन निर्णयात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदूळ वाहतूक व धान्यादी मालाच्या पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे नियुक्त पुरवठादारांचा उल्लेख आहे.

मग शाळा क्रमांक ८ मध्ये नेमके काय झाले?

शासनाच्या योजनेत धान्याचा पुरवठा, वाहतूक, साठवणूक आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराचे प्रमाण याबाबत निश्चित व्यवस्था असताना, ५० किलोचे लेबल असलेल्या पोत्यात प्रत्यक्ष ३५ ते ४० किलोच तांदूळ आढळल्याचा नागरिकांचा दावा खरा असल्यास हा अत्यंत गंभीर प्रकार ठरू शकतो.

गोडाऊनपासून शाळेपर्यंत तांदूळ पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीची तपासणी करणे त्यामुळे आवश्यक ठरते. गोडाऊनमधील नोंद, प्रत्यक्ष वजन, वाहनाद्वारे झालेली वाहतूक, शाळेला देण्यात आलेला साठा आणि शाळेच्या स्टॉक रजिस्टरमधील नोंदी यांचा ताळमेळ तपासल्यास नेमकी वस्तुस्थिती समोर येऊ शकते.

धाराशिव शहरासह जिल्हाभरात किती तांदूळ कमी पडतोय?

शाळा क्रमांक ८ मधील प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आता धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शालेय पोषण आहारासाठी पुरवठा होणाऱ्या तांदळाचे प्रत्यक्ष वजन किती असते? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

शिक्षण विभागातील संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना या कथित भोंगळ कारभाराची माहिती नाही का? धान्य पुरवठ्याच्या प्रत्येक टप्प्यावर तपासणी व देखरेख करण्याची जबाबदारी असताना प्रत्यक्षात अशी तफावत आढळत असेल तर नियंत्रण यंत्रणा नेमकी कुठे आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

तसेच, शाळांसाठी आलेला तांदूळ प्रत्यक्षात काळ्या बाजारात वळविला जात नाही ना? या प्रकारावर नियंत्रण ठेवणारी प्रवर्तन यंत्रणा नेमकी काय करत आहे? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

‘लहान मुलांच्या ताटातील घासावर डल्ला तर नाही ना?’

शालेय पोषण आहार हा गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या पोषणाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे धान्याच्या वजनात मोठी तफावत आढळत असल्याचा दावा होत असेल तर लहान मुलांच्या ताटातील घासावरच डल्ला मारण्याचा प्रकार तर होत नाही ना? अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शिक्षण विभागातील काही अधिकारी, संबंधित पुरवठादार आणि दलाल यांच्या संगनमताने शालेय पोषण आहाराच्या धान्यात अनियमितता होत नाही ना? याचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, प्रशासनाच्या चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

संपूर्ण पुरवठा साखळीचे वजनासह ऑडिट करा

नागरिकांनी केलेल्या वजनाच्या दाव्याची अधिकृत प्रशासनाकडून अद्याप पडताळणी झाली आहे की नाही, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने शाळा क्रमांक ८ येथे प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा, अधिकृत वजन तपासणी आणि स्टॉक रजिस्टरची पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.

यासोबतच संबंधित तांदळाचा पुरवठादार, गोडाऊनमधील साठा, वाहनातून झालेली वाहतूक, वितरणाच्या नोंदी, शाळेच्या स्टॉक रजिस्टरमधील नोंदी आणि प्रत्यक्ष प्राप्त झालेला तांदूळ यांचा ताळमेळ तपासावा. अनियमितता अथवा शासनाच्या करारातील अटींचा भंग आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गरीब विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी शासनाकडून येणाऱ्या धान्याच्या प्रत्येक दाण्याचा हिशोब पारदर्शकपणे जनतेसमोर आला पाहिजे. शाळा क्रमांक ८ मधील तांदळाच्या वजनाचा दावा खरा की खोटा, याचा फैसला आता अधिकृत तपासणीतूनच होणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!