हेडकॉर्टरला अधिकारी की रोज ‘ये-जा’ करणारे पाहुणे?
धाराशिव जिल्हा परिषदेत काही अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची चर्चा; कार्यालयातही वेळेवर उपस्थिती नसल्याचा आरोप
‘अकरानंतर’ येणाऱ्या अधिकाऱ्यांवर सीईओ कारवाई करणार का? धाराशिवकरांचे लक्ष
धाराशिव (सय्यद कलीम मुसा) : धाराशिव जिल्हा परिषदेमधील काही अधिकारी शासनाच्या नियमांनुसार आपल्या नियुक्तीच्या मुख्यालयी वास्तव्यास राहतात की दररोज बाहेरून ये-जा करतात, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही अधिकारी मुख्यालयी न राहता दररोज ये-जा करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, संबंधित अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतही वेळेवर उपस्थित राहत नसल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही अधिकारी सकाळच्या नियमित कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित न राहता अकरा वाजल्यानंतर कार्यालयात येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिक, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या लाभार्थ्यांना संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
मुख्यालयी राहण्याच्या नियमाला हरताळ?
शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी अथवा नियमानुसार निश्चित केलेल्या मुख्यालयात उपलब्ध राहणे अपेक्षित असताना काही अधिकारी प्रत्यक्षात मुख्यालयी वास्तव्य करतात का, हा आता चर्चेचा विषय बनला आहे.
जर अधिकारी दररोज दुसऱ्या शहरातून अथवा गावातून ये-जा करीत असतील, तर त्यांच्या कार्यालयीन उपस्थितीची वेळ आणि मुख्यालयी वास्तव्याची नोंद तपासली जाते का? असा सवाल धाराशिवकरांकडून उपस्थित केला जात आहे.
मुख्यालयी न राहता दररोज ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे सकाळच्या वेळेत कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
अकरानंतर येणारे अधिकारी कोण?
जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या विभागातील अधिकारी नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित असतात आणि कोण अधिकारी उशिरा येतात, याची तपासणी केल्यास अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात.
बायोमेट्रिक अथवा उपस्थिती रजिस्टरची तपासणी, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि मुख्यालयी वास्तव्याबाबतच्या नोंदी तपासल्या तर सत्य परिस्थिती समोर येऊ शकते.
त्यामुळे गेल्या काही महिन्यांतील संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती तपासून प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची वेळ आणि मुख्यालयी वास्तव्याची वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्हा परिषद सीईओ काय कारवाई करणार?
जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध शासकीय योजनांशी थेट जोडलेली महत्त्वाची यंत्रणा आहे. त्यामुळे अधिकारी वेळेवर कार्यालयात उपलब्ध नसतील किंवा मुख्यालयी राहत नसतील, तर त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या कामांवर होऊ शकतो.
त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणार का? संबंधित विभागप्रमुखांकडून अहवाल मागविणार का? मुख्यालयी वास्तव्यास असण्याबाबतची नोंद तपासणार का? तसेच कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या अथवा उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणार का, याकडे आता धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.
‘हेडकॉटर’वर राहणार की रोजची ये-जा सुरूच राहणार?
शासकीय पगार घेऊन जनतेची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेसाठी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यालयी न राहता दररोज ये-जा होत असेल आणि त्याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असेल, तर वरिष्ठ प्रशासनाने याकडे केवळ चर्चेचा विषय म्हणून न पाहता प्रत्यक्ष तपासणी करणे गरजेचे आहे.
दरम्यान, नेमके कोण अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत? कोण नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाहीत? आणि त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी आहे का? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे जिल्हा परिषद प्रशासनाने जनतेसमोर आणावीत, अशी मागणी होत आहे.
आता धाराशिवकरांना प्रतीक्षा आहे ती जिल्हा परिषद सीईओंच्या कारवाईची!