धाराशिवच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही; मल्हार पाटील यांच्यासह नगरसेवक राहुल काकडे यांची भेट
शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व पायाभूत सुविधांवर सविस्तर चर्चा
धाराशिव : धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याबाबतची माहिती धाराशिव नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल हरिभाऊ काकडे यांनी दिली.
नगरसेवक राहुल काकडे यांनी मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समवेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी धाराशिव शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
धाराशिव शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय झाला. शहरातील रस्त्यांची सुधारणा, नियमित व सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, वाहतुकीच्या समस्या सोडविणे तसेच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे हाती घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे राहुल काकडे यांनी सांगितले.
आगामी काळात धाराशिव नगरपरिषदेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणि विकासकामे मार्गी लावून शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प असल्याचे नगरसेवक राहुल काकडे यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मल्हार पाटील यांच्या सहकार्याने धाराशिव शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे नगरसेवक राहुल काकडे यांनी सांगितले.