नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या; ठाकरे परिवाराशी एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करू
तानाजी जाधवर यांचा भाजपसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा; ‘एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेनेची लढाई सुरूच राहणार’
धाराशिव : सध्या सुरू असलेली नगरसेवकांची पळवापळवी ही लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारी असून, जनतेने ज्या प्रतिनिधींना निवडून दिले त्यांना राजकीय दबाव किंवा सत्तेच्या बळावर आपल्या गोटात ओढण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी व्यक्त केली.
धाराशिव शहरातील बदलत्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना जाधवर म्हणाले की, सत्ता येते आणि जाते; मात्र विचारांशी आणि नेतृत्वाशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ताकद असते. ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या नगरसेवक आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन आगामी काळात अधिक ताकदीने संघर्ष केला जाईल.
नगरसेवकांची पळवापळवी करून राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी अशा प्रकारांमुळे लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कमी होण्याची शक्यता आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्टता ठेवणे गरजेचे असल्याचेही जाधवर यांनी सांगितले.
ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठावंत असलेल्या शिवसैनिकांना कुठल्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता संघटित राहण्याचे आवाहन करत जाधवर म्हणाले की, “ज्यांनी ठाकरे परिवाराशी निष्ठा ठेवली आहे, त्यांना सोबत घेऊन आम्ही संघर्ष करू. सत्ता आणि पदापेक्षा विचारांची निष्ठा मोठी आहे.”