पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार!; तानाजी जाधवर यांचा इशारा
धाराशिव, ता. २७ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षाशी तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केलेल्या मतदारांशी गद्दारी केली आहे. पक्षांतर करणाऱ्या या नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठी तसेच त्यांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली.
नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर मतदारांनी ज्या उमेदवारांना निवडून दिले, त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा कायम ठेवणे अपेक्षित होते. मात्र, निवडून आल्यानंतर पक्षांतर केल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा गेला असल्याची भूमिका ठाकरे पक्षाकडून मांडण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येणार असून, या प्रकरणाचा कायदेशीर पद्धतीने पाठपुरावा केला जाईल, असे तानाजी जाधवर यांनी सांगितले. पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन नंतर पक्षाची साथ सोडणाऱ्या नगरसेवकांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, पेट्या-खोके यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्षाशी इमान राखणाऱ्या रवी वाघमारे व राज निकम यांच्याबद्दल पक्षाला अभिमान आहे, असे मत जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केल्याची माहितीही जाधवर यांनी दिली.