पारगाव प्रभाग समिती बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामसेवकांच्या संपामुळे बैठक पुन्हा घेणार
पारगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद धाराशिवच्या पारगाव जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग समिती बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, अंगणवाडी, स्वच्छता, नाली, पथदिवे, सामाजिक सुविधा तसेच गावातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत आपल्या समस्या व मागण्या मांडल्या.
बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी पारगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात प्रभाग समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या तथा प्रभाग समिती अध्यक्षा सौ. सविता विकास तळेकर होत्या. समितीचे सचिव विस्तार अधिकारी माचवे साहेब, तसेच प्रवीण गायकवाड, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मात्र, जिल्हा परिषद गटातील ग्रामसेवक विविध मागण्यांसाठी संपावर असल्याने संबंधित ग्रामसेवक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेणे शक्य झाले नाही. ग्रामसेवकांचा संप मिटताच प्रभाग समितीची बैठक पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्षा सौ. सविता विकास तळेकर यांनी दिली.
“नागरिकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य”
बैठकीत नागरिकांनी आपल्या गावातील मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न मांडले. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची नोंद घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन सौ. सविता विकास तळेकर यांनी दिले.
पारगाव जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तसेच मतदारसंघाचे आमदार मा. तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांच्या प्रश्नांना निधीची जोड देण्याचा प्रयत्न
गावाच्या विकासासाठी केवळ प्रशासनाची यंत्रणा पुरेशी नसून नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. नागरिकांनी बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, त्यांना प्राधान्यक्रम देऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी भूमिका सौ. सविता विकास तळेकर यांनी मांडली.
ग्रामसेवकांचा संप संपल्यानंतर पुन्हा प्रभाग समितीची बैठक घेऊन ग्रामपंचायतनिहाय प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या गावातील विकासकामे व मूलभूत सुविधांच्या मागण्या मांडाव्यात, असे आवाहनही करण्यात आले.