जिल्हा परिषद धाराशिवच्या २० ‘चांदण्यांची’ नासाकडे झेप; अध्यक्षा अर्चनाताईंच्या हस्ते विशेष गौरव!

जिल्हा परिषद धाराशिवच्या २० ‘चांदण्यांची’ नासाकडे झेप; अध्यक्षा अर्चनाताईंच्या हस्ते विशेष गौरव!

धाराशिव, दि. २० ऑगस्ट २०२६ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि स्वप्नांना आता आकाशाचीही मर्यादा उरलेली नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नासास्थळीय जिल्हास्तरीय परीक्षेत अंतिम निवड झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील २० गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा (NASA) भेटीची ऐतिहासिक संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव सोहळा गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री तथा परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना नासाभेटीची अविस्मरणीय संधी उपलब्ध होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही केवळ नासाभेट नसून, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला जागतिक पातळीवरील नवे क्षितिज देणारी ऐतिहासिक संधी ठरणार आहे.

आठही तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी गाठले गुणवत्तेचे शिखर

नासा जिल्हास्तरीय परीक्षेच्या अंतिम निवड यादीत भूम, परंडा, धाराशिव, उमरगा, कळंब, लोहारा, तुळजापूर आणि वाशी या आठही तालुक्यांतील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत गुणवत्तेची मोहोर उमटवली असून, काही विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान विषयांतही विशेष प्रावीण्य मिळवले आहे.

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेला मिळाली नवी ओळख

लहानशा गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता, मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर नासापर्यंतचा प्रवास निश्चित केला आहे. त्यांच्या डोळ्यांत असलेली अंतराळाची स्वप्ने आता प्रत्यक्ष नासाच्या प्रगत अवकाश संशोधन सुविधांचा अनुभव घेताना साकार होणार आहेत. रॉकेट, उपग्रह, अवकाश संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि मानवाच्या अंतराळातील भवितव्याचा जवळून परिचय या विद्यार्थ्यांना होणार असल्याने त्यांच्या ज्ञानविश्वाला नवी दिशा मिळणार आहे.

या यशामागे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील यांची संकल्पना, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही जागतिक दर्जाची गुणवत्ता आहे, हे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नासाभेटीपूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन

यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. रवींद्र खंदारे यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, उत्सुकता आणि प्रश्न जाणून घेतले. नासा भेटीदरम्यान तेथील वातावरणाशी कशाप्रकारे जुळवून घ्यावे, नवीन गोष्टींकडे जिज्ञासू आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे पाहावे, तसेच या ऐतिहासिक संधीचा शैक्षणिकदृष्ट्या जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

नासा येथील अवकाश संशोधन, वैज्ञानिक प्रयोग, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन पद्धती यांचा बारकाईने अभ्यास करून आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये नासाभेटीबाबतचा आत्मविश्वास, जिज्ञासा आणि उत्साह अधिक वाढला.

विद्यार्थ्यांच्या मनात नासाचे कुतूहल; पालकांच्या डोळ्यांत अभिमान

जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अपेक्षा, स्वप्ने आणि मनातील भावना जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनीही नासा भेटीबाबतचा उत्साह व्यक्त केला. आपल्या मुलांना मिळालेल्या या अनोख्या संधीबद्दल पालकांनी भावनिक शब्दांत मनोगत व्यक्त करत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

यावेळी शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद शाळांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध गुणवत्तावर्धक उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

नासाभेटीनंतर पुन्हा गौरव करण्याचा संकल्प

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी या २० विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीबाबतही जिव्हाळा व्यक्त केला. नासा भेटीचा अनुभव घेऊन विद्यार्थी धाराशिवमध्ये परतल्यानंतर त्यांचे अनुभव ऐकून घेण्यासाठी तसेच त्यांच्या ऐतिहासिक यशाचा पुन्हा एकदा विशेष गौरव सोहळा आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

नासाभेटीतून विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी त्यांना आपले अनुभव सर्वांसमोर मांडण्याची संधी देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची नासाभेट केवळ त्यांच्यापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना नवी स्वप्ने पाहण्याची आणि विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२० विद्यार्थ्यांच्या यशातून जिल्हा परिषद शाळांचा नवा अध्याय

धाराशिव जिल्हा परिषद शाळांमधील २० गुणवंत विद्यार्थ्यांची नासाभेटीसाठी झालेली निवड हा जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीतील मैलाचा दगड ठरला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता आहे, हे या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.

धाराशिवच्या मातीतील हे २० ‘चांदणे’ आता अंतराळाच्या विश्वाची सफर करणार आहेत. त्यांच्या स्वप्नांना नासाच्या आकाशाची जोड मिळणार असून, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारी ही घटना धाराशिवच्या शैक्षणिक इतिहासातील अभिमानाची आणि प्रेरणादायी ठरणार आहे.

“जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही जग जिंकू शकतो” हा विश्वास या २० विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून प्रत्यक्षात सिद्ध केला आहे.

नासा भेटीसाठी निवड झालेले २० गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या प्रशाला

१. उमप आरव शरद – भूम – जि. प. प्राथमिक शाळा अंधारेवस्ती, माणकेश्वर
२. तेजस्वी श्यामराव वारे – भूम – पीएम श्री जि. प. शाळा, ईट
३. काळे अर्णव अनिल – परंडा – जि. प. प्राथमिक शाळा, देऊळगाव
४. जगताप सायली दत्तात्रय – परंडा – जि. प. प्राथमिक शाळा, इंगळगाव
५. मारवाडकर प्रज्वल संतोष – धाराशिव – जि. प. प्राथमिक शाळा, गोरवाडी
६. लांडगे मृत्युंजया महेश – धाराशिव – जि. प. कन्या प्राथमिक शाळा, तडवळे कसबे
७. गुरव श्रेयश ज्ञानेश्वर – उमरगा – जि. प. प्राथमिक शाळा, सप्तगाव
८. बंदगे वेदिका गोविंद – उमरगा – जि. प. प्राथमिक शाळा, चिंचोली जं.
९. कोकाटे इंद्रजीत श्रीराम – कळंब – जि. प. प्राथमिक शाळा, वाटवडा
१०. शिंपले समृद्धी सतीश – कळंब – पीएम श्री जि. प. शाळा, शिराढोण
११. सूर्यवंशी रुद्र संदीपान – लोहारा – जि. प. प्राथमिक शाळा, एकांडी लोहारा
१२. जाधव स्वरांजली शरद – लोहारा – जि. प. प्राथमिक शाळा, हिप्परगा रवा
१३. धनवडे वेदांत प्रभाकर – तुळजापूर – जि. प. प्राथमिक शाळा, बारूळ
१४. पाटील संजना संजय – तुळजापूर – पीएम श्री जि. प. शाळा, काटगाव
१५. उंडरे सत्यजीत सुधीर – वाशी – जि. प. के. प्राथमिक शाळा, वाशी
१६. पांचाळ संस्कृती दीपक – वाशी – जि. प. शाळा, इंदापूर
१७. डावकरे कामाक्षी श्रीहरी – कळंब – जि. प. शाळा, मसा खंडेश्वरी
१८. जगदाळे चंदन अमोल – भूम – जि. प. शाळा, भूम
१९. स्वामी मयुरेश महेश – उमरगा – जि. प. शाळा, माडज
२०. सावंत वेदिका अश्रुबा – धाराशिव – जि. प. शाळा, जागजी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!