व्यवसायाला जागा, नागरिकांना मोकळा रस्ता; प्रभाग १३ मध्ये भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर

व्यवसायाला जागा, नागरिकांना मोकळा रस्ता; प्रभाग १३ मध्ये भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर
धाराशिव : शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे ठेवतानाच भाजी विक्रेत्यांच्या व्यवसायाचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रभाग क्रमांक १३ मध्ये सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देशपांडे स्टँड ते जिजामाता उद्यान या मार्गावरील रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना रस्त्याच्या आतील उपलब्ध जागेत बसविण्यात आले. त्यामुळे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून, विक्रेत्यांचा व्यवसायही सुरू राहणार आहे.
दैनंदिन बाजार हा नागरिकांच्या गरजेचा भाग असून भाजी विक्रेत्यांचा व्यवसायही तितकाच महत्त्वाचा आहे. कोणाच्याही व्यवसायाचे नुकसान करण्याचा उद्देश नसून, रस्त्यावर बाजार भरल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळणे आवश्यक असल्याचे नगरसेविका सौ. वैशाली रवि मुंडे यांनी सांगितले.
रस्त्यावर बसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने विक्रेत्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करण्यात आला. त्यांना स्वच्छ, मोकळ्या आणि सुरक्षित जागेत व्यवसाय करण्याची विनंती करण्यात आली. विक्रेत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत ही विनंती मान्य केली.
व्यवसायही सुरू राहणार आणि रस्ताही वाहतुकीसाठी मोकळा राहणार, असा समतोल साधण्यात आल्याने नागरिकांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. शहरातील विकासकामांतून निर्माण झालेले रस्ते नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी उपलब्ध राहावेत, यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
“ही कोणाविरुद्धची भूमिका नसून भाजी विक्रेत्यांचे हित, नागरिकांची सोय, सुरक्षितता आणि शहरातील सुरळीत वाहतूक यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे,” असे सौ. वैशाली रवि मुंडे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये विकासासोबत शिस्तबद्ध आणि सुरळीत वाहतुकीकडे एक पाऊल टाकण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!