उमेदच्या समुदाय संसाधन व्यक्तींना प्रत्येक कर्जप्रकरणामागे १ हजारांचा प्रोत्साहन भत्ता; धाराशिव जिल्हा परिषद राज्यात ठरणार पहिली

उमेदच्या समुदाय संसाधन व्यक्तींना प्रत्येक कर्जप्रकरणामागे १ हजारांचा प्रोत्साहन भत्ता; धाराशिव जिल्हा परिषद राज्यात ठरणार पहिली
३५०० महिला उद्योजक घडविण्याचा संकल्प; ७३४ गावांमध्ये प्रत्येकी ४ ते ५ महिलांना कर्ज उपलब्ध करून देणार : जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील
धाराशिव : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेकडून अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. उमेद अभियानात कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तींना प्रत्येक कर्जप्रकरणासाठी १ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार असून, अशा प्रकारची योजना राबविणारी धाराशिव जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ३८४ स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्यात आले असून, या गटांमध्ये १ लाख ४६ हजार ११९ सदस्य सहभागी आहेत. या माध्यमातून १ लाख ४६ हजार ११९ कुटुंबांचे समावेशन झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात ७७८ ग्रामसंघ, ५५ प्रभागसंघ, ५१४ उत्पादक गट आणि महिलांच्या ९ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
उमेदच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील प्रत्येक महिलेला उद्योजक म्हणून घडवून तिला ‘लखपती दीदी’ म्हणून वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यात उमेद अभियानांतर्गत सुमारे १२०० समुदाय संसाधन व्यक्ती विविध पातळ्यांवर कार्यरत आहेत. स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यापासून बचतीची सवय लावणे, व्यवसाय उभारणीसाठी समूहातून कर्ज उपलब्ध करून देणे तसेच व्यवसायासाठी आवश्यक असलेली विविध प्रकारची मदत करण्याचे महत्त्वपूर्ण काम या समुदाय संसाधन व्यक्तींकडून केले जात आहे.
या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून जिल्ह्यात सध्या १ लाख १९ हजार लखपती दीदी तयार झाल्या आहेत. आता यापुढे ‘करोडपती दीदी’ तयार करण्याचा उमेद अभियानाचा मानस असल्याचे अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
७३४ गावांतून ३५०० महिला उद्योजक घडविण्याचा संकल्प
जिल्हा परिषद धाराशिवकडून सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्यात येत असून, आकांक्षित जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसून जिल्ह्याला विकासाच्या नव्या दिशेने नेण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ७३४ गावांमध्ये प्रत्येकी किमान ४ ते ५ महिला उद्योजक घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या महिलांना मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या योजनांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून किमान ४ ते ५ महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यातून जिल्ह्यात जवळपास ३५०० महिला उद्योजक घडविण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण व अभिनव पाऊल ठरणार आहे.
प्रत्येक कर्जप्रकरणामागे सीआरपींना १ हजारांचा प्रोत्साहन भत्ता
हा उपक्रम राबविताना उमेद अभियानात काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्तींना प्रत्येक कर्जप्रकरणासाठी १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला उद्योजकांना कर्ज मिळवून देण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय उभारणीच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तींना प्रोत्साहन मिळणार आहे.
अशा प्रकारची प्रोत्साहन भत्ता योजना राबविणारी धाराशिव जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरणार आहे. या अभिनव योजनेमुळे उमेद अभियानात काम करणाऱ्या समुदाय संसाधन व्यक्तींचे मनोबल वाढणार असून, त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभही मिळणार आहे.
CMEGP मध्ये सलग तीन वर्षे जिल्ह्याची राज्यात आघाडी
धाराशिव जिल्ह्याने मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२५-२६ मध्ये CMEGP अंतर्गत जिल्ह्यात ७०० पेक्षा अधिक उद्योगांना कर्ज वितरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील सलग तीन वर्षे धाराशिव जिल्हा CMEGP योजनेत राज्यात प्रथम राहिला आहे.
हीच कामगिरी आणि परंपरा कायम ठेवण्यासाठी समुदाय संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या प्रवाहात आणण्याची ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ७३४ गावांमध्ये महिला उद्योजक निर्माण झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून, महिलांच्या हातात आर्थिक स्वावलंबनाची नवी ताकद निर्माण होणार आहे.
महिलांना केवळ बचत गटापर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना उद्योजक बनविणे, ‘लखपती दीदी’नंतर ‘करोडपती दीदी’ घडविणे आणि प्रत्येक गावात महिला उद्योजकांची नवी फळी उभी करणे, या उद्देशाने धाराशिव जिल्हा परिषदेकडून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!