तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईला तीव्र विरोध

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचे एल्गार; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईला तीव्र विरोध

 तामलवाडी टोलनाका परिसरातील गाळाधारक शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, पान स्टॉल, दूध विक्रेते, स्नॅक्स सेंटर चालक तसेच इतर स्थानिक व्यावसायिकांच्या रोजगार व उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या व्यावसायिकांना हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तामलवाडी टोलनाका परिसरात शांततामय व लोकशाही मार्गाने निषेध आंदोलन करण्यात आले.
तामलवाडी टोलनाका परिसरात अनेक वर्षांपासून विविध हॉटेल व्यावसायिक, दुकानदार व छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या व्यवसायांवर अनेक कुटुंबांचे रोजगार व आर्थिक उत्पन्न अवलंबून आहे. विशेष म्हणजे, बहुतांश व्यावसायिक हे स्वतः शेतकरी असून त्यांच्या व्यवसायाच्या जागेच्या पाठीमागेच त्यांची शेती आहे. त्यामुळे व्यवसाय बंद झाल्यास त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.
तामलवाडी टोलनाका परिसरातील हॉटेल व दुकाने हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जाऊ शकतो आणि त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी स्थानिक व्यावसायिकांच्या रोजगाराचा व उपजीविकेचा विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्र्यांच्या जमिनीबाबतही भूमिका मांडण्यात आली. पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी जमीन घेतली असून त्या जागेवर शेती करणे, फळबाग करणे किंवा रिसॉर्ट उभारणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र, त्यासाठी गोरगरीब स्थानिकांच्या रोजगाराचे साधन असलेली दुकाने व व्यवसायाची ठिकाणे अतिक्रमणाच्या नावाखाली हटविणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली. स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम करणारी कारवाई तात्काळ थांबवून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणीही करण्यात आली.
स्थानिक व्यावसायिकांच्या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून, संबंधित व्यावसायिकांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनास जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, धिरज पाटील, धनंजय राऊत, शिवाजी गायकवाड, अरविंद बेडगे,अमोल कुतवळ,दिलीप भोकरे, सयाजी देशमुख, राजेंद्र शेंडगे, गौरीशंकर मुळे, अझहर ( नगरसेवक ), गोपाळ सुरवसे, हणमंत गवळी, दादासाहेब चौधरी, सिद्धेश्वर अण्णा कस्तुरे, सुनिल माळी, सत्तार मुलाणी, गोविंद डोंगरे, डॉ. पंकज घुगे, पोपट मोटे, उत्तम दादा पाटील, संजय गुंजूटे, तुकाराम नवगिरे, ज्ञानेश्वर जगताप,सुमन नवगिरे,विकास वडणे, दीपक वडणे, अश्विनकुमार आतकरे, जुबेर शेख, संदीप सुरवसे, पेंदे, सौ. वाघे ताई शिंदे, भीमा रणसुरे, दादाराव नेटके, हरिदास घोटकर,निजाम शेख, तानाजी नेटके, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, तुळजापूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी तसेच तामलवाडी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच व्यापारी दुकानदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार व उपजीविका अबाधित ठेवूनच प्रशासनाने पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!