पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची जोरदार मोर्चेबांधणी; आढावा बैठकीत संघटनात्मक नियुक्त्या
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधानपरिषदेत बुलंद आवाज पोहोचविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची कार्यकर्त्यांना सूचना
धाराशिव : आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, धाराशिव येथे पदवीधर विभागाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. पदवीधर मराठवाडा प्रमुख दिलीप घुगे, सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, संजय मामा निंबाळकर तसेच जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत पदवीधर विभागाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध तालुका व शहर समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. धाराशिव तालुका समन्वयकपदी सत्यजीत पडवळ व सावन देवगिरे, धाराशिव शहर समन्वयकपदी सुनील गायकवाड व ओमकार नायगावकर, कळंब तालुका समन्वयकपदी नदीम मुलानी, तुळजापूर तालुका समन्वयकपदी सिद्राम कारभारी व चेतन बंडगर यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच उमरगा तालुका समन्वयकपदी तानाजी जाधव व संगमेश्वर स्वामी, उमरगा शहर समन्वयकपदी ॲड. पृथ्वीराज घोडके, भूम तालुका समन्वयकपदी अजित तांबे आणि वाशी तालुका समन्वयकपदी अनिल क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली.
पदवीधरांच्या हक्कांसाठी आक्रमक लढा उभारण्याचा निर्धार
बैठकीत पदवीधरांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता त्यांच्या हक्कांसाठी विधानपरिषदेत बुलंद आणि आक्रमक आवाज पोहोचविणारे सक्षम नेतृत्व उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याची रणनीती यावेळी निश्चित करण्यात आली.
तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अडचणी, शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या, पदवीधरांच्या हक्कांचे प्रश्न तसेच तरुणांच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाची भूमिका आणि विचार पोहोचविणे, मतदारांशी थेट संवाद वाढविणे, पदवीधरांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यासाठी संघटितपणे आवाज उठविणे, यावर पदाधिकाऱ्यांनी विशेष भर दिला.
निवडणूक ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून पदवीधरांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांना दिशा देण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनात्मक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
तालुकानिहाय संघटन मजबूत करण्यावर भर
पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तालुका व शहरनिहाय बैठका, मतदारांशी थेट संवाद, पदवीधरांच्या प्रश्नांचे संकलन आणि त्यावर पक्षाची भूमिका मांडण्याचे नियोजन करण्याबाबतही चर्चा झाली. आगामी काळात पदवीधर विभागाची संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम करून निवडणुकीसाठी तळागाळापर्यंत तयारी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीला प्रविण कोकाटे, भारत सांगळे, सागर बाराते, रवी वाघमारे, प्रदीप घोणे, सातपुते सर, विक्रम पाटील, जगदीश शिंदे, सुनील वाघ, राकेश सूर्यवंशी, तात्या बहीर, नेताजी जावळे, बिभीषण देशमुख, विकास जाधव, संजय भोरे, राज निकम, आबा सारडे, अण्णा पवार, ओंकार सारडे, संजय भोसले, शोकत शेख, गजानन नलावडे, विशाल जमाले, दत्ता चौधरी, अतुल चव्हाण, राजदीप गायकवाड, दीपक जाधव, अभीराज कदम, मुजीब काझी, प्रदीप फरताडे, संतोष टोणगे, संदीप गायकवाड, लखन देशमुख, अक्षय बाराते, रोहित चव्हाण, अर्जुन साळुंके, सिद्दीक तांबोळी, असद रजवी, माऊली पाटील, गोविंद पाटील, पोपट खरात, बाळासाहेब मुंडे, मारुती देशमुख, अम्रत जाधव, तानाजी सरडे, बिभीषण गायकवाड, विकास झांजे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.