येरमाळ्यात २४ ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताहदैनंदिन भजन-कीर्तनाने रंगणार येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमा

येरमाळ्यात २४ ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताह
दैनंदिन भजन-कीर्तनाने रंगणार येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमा यात्रेपूर्वीचा भक्तिमय सोहळा; ३० ऑगस्टला भव्य रक्तदान शिबिर
येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) : परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल मंदिर, येरमाळा येथे २४ ते ३० ऑगस्टदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त आयोजित या सप्ताहात दररोज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिला भजनी मंडळांचे भजन, प्रवचन, हरिकीर्तन तसेच हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
सप्ताहाच्या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ९ ते ११ गाथा भजन, सकाळी ११ ते सायंकाळी ५ महिला भजनी मंडळांचे भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, तर रात्री ८.३० ते ११ हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर होणार आहे. दररोजच्या कीर्तनानंतर कापूर आरती होणार असून परिसरातील विविध गावांतील गायनाचार्य, मृदंगाचार्य व टाळकरी सहभागी होणार आहेत.
सोमवारी (ता. २४) ह.भ.प. गिरीश कुलकर्णी येरमाळकर यांचे प्रवचन, तर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पालसिंगणकर यांचे कीर्तन होणार आहे. यानंतर मळकापूर, येरमाळा व नागझरवाडी येथे हरिजागर होईल. मंगळवारी (ता. २५) ह.भ.प. विनोद कुलकर्णी (बावीकर) यांचे प्रवचन व ह.भ.प. विष्णू महाराज टेंभुकर, पंढरपूर यांचे कीर्तन होणार असून परतापूर, उंबरा व पानगाव येथे हरिजागर होणार आहे.
बुधवारी (ता. २६) ह.भ.प. गिरीश कुलकर्णी येरमाळकर यांचे प्रवचन व ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर यांचे कीर्तन होईल. गुरुवारी (ता. २७) ह.भ.प. दत्तात्रय महाराज बोधले यांचे प्रवचन व ह.भ.प. शिवाजी महाराज मुळे आडसकर यांचे कीर्तन होणार आहे.
शुक्रवारी (ता. २८) सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत ह.भ.प. श्रीनिवास महाराज जगताप पालसिंगणकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. सकाळी ११ वाजता दहीहंडीसह पालखी येडेश्वरी मंदिराकडे गावप्रदक्षिणेसाठी प्रस्थान करेल. दुपारी ३ वाजता येडेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पारंपरिक चिंचेच्या झाडावर ह.भ.प. दत्तात्रय बोधले महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येईल. रात्री ९ वाजता येरमाळा आराधी मंडळाचा आराधी गाणे-जागराचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (ता. २९) प्रमुख भजनाचा कार्यक्रम होणार असून रविवारी (ता. ३०) दिवसभर पालखीची गावातील मुख्य रस्ते व चौकांतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी मिरवणुकीनंतर कै. आबाजी पाटील यांच्या वाड्यात ह.भ.प. जगन्नाथ महाराज खरात, आळंदी यांचा भारूडाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर आनंदधाम विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी (ता. ३०) रामभाई शाह रक्तपेढी, बार्शी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
श्री येडेश्वरी देवीच्या नारळी पौर्णिमा यात्रेपूर्वी आयोजित या धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन येडेश्वरी देवीचे मानकरी समस्त पाटील परिवार व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!