चार मोटारसायकलींसह चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात!
धाराशिवसह औसा व कर्जत हद्दीतून चोरीस गेलेल्या ४ मोटारसायकली जप्त; १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
धाराशिव : मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या आदेशावरून दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि मोरे व पथक धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात एक इसम चोरीची मोटारसायकल ताब्यात बाळगून आहे.
प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ नमूद इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने परमेश्वर उर्फ सुरेश चंदर काळे, वय ४० वर्षे, रा. जुना बस डेपो जवळ, पारधी पिढी, धाराशिव, ता. जि. धाराशिव असे सांगितले.
त्याच्याकडे चोरीच्या मोटारसायकलीबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने चोरून आणलेल्या मोटारसायकली लपवून ठेवल्याचे सांगितले. पथकाने तात्काळ नमूद ठिकाणी जाऊन शोध घेतला असता एकूण ४ मोटारसायकली मिळून आल्या.
धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता सदर मोटारसायकली आनंदनगर पोलीस ठाणे, धाराशिव ग्रामीण तसेच इतर जिल्ह्यातील औसा व कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. नमूद इसमास तसेच १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या एकूण ४ मोटारसायकली ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव आनंदनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोहेका समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, मपोह शोभा बांगर, प्रकाश, चापोका दहिहांडे, शेरखाने यांच्या पथकाने केली आहे.