तुळजाभवानी मंदिराच्या निविदेत ‘खोटी’ कागदपत्रे?; चौकशीच्या मागणीने खळबळ, दोषींवर कारवाईची मागणी!
नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांचे प्रशासनाला थेट सवाल; संशयास्पद बँक सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्यांसह संबंधितांचीही चौकशी करण्याची मागणी
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या खजूर व नारळ लिलावाच्या निविदा प्रक्रियेत काही निविदाधारकांनी संशयास्पद अथवा खोटी बँक सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रे सादर केल्याची बाब निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद (पिटू) विलासराव गंगणे यांनी मंदिर संस्थानच्या प्रशासनाकडे केली आहे.
गंगणे यांनी २५ ऑगस्ट रोजी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना दिलेल्या पत्रातून निविदा प्रक्रियेतील कागदपत्रांच्या पडताळणीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित निविदाधारकांनी सादर केलेली बँक सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रे अधिकृत आहेत की नाहीत, त्याबाबत संबंधित बँकांकडून खातरजमा करण्यात आली आहे का, याचा स्पष्ट खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कागदपत्रे संशयास्पद असतील तर कारवाई का नाही? असा सवाल उपस्थित करत निविदा प्रक्रियेत कागदपत्रांची योग्य पडताळणी करण्यात आली का, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा अथवा नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संशयास्पद कागदपत्रे सादर करणाऱ्या निविदाधारकांना कोणत्याही प्रकारे संरक्षण दिले जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, तसेच खोटी माहिती अथवा कागदपत्रे सादर करणाऱ्या निविदाधारकांची निविदा रद्द करून कायदेशीर कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका गंगणे यांनी पत्रातून मांडली आहे.
या मागणीमुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चौकशी झाली तर नेमके काय समोर येणार? कागदपत्रे खरी की खोटी? आणि नियमबाह्य प्रकार आढळल्यास जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाच्या चौकशीतूनच स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, मंदिर संस्थानच्या निविदा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झाला असेल तर त्याची पाळेमुळे शोधून दोषींवर कारवाई होणे गरजेचे असल्याची भूमिका व्यक्त होत असून, या प्रकरणात प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.