परांडा तालुक्यातील गरीब रुग्णाच्या मदतीला आमदार तानाजीराव सावंत धावले; उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय
राजुरी येथील दामोदर गोडगे यांच्या उपचारासाठी तत्परता; हलाखीच्या परिस्थितीतील कुटुंबाला मोठा दिलासा
परांडा : भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी राजुरी येथील आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत असलेल्या रुग्णाच्या उपचारासाठी तत्परतेने पुढाकार घेतला. राजुरी येथील दामोदर कोंडीबा गोडगे हे बार्शी येथील डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.
गोडगे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती मिळताच आमदार सावंत यांनी तातडीने रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांशी संपर्क साधला. रुग्णावर विनाविलंब आवश्यक व दर्जेदार उपचार सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
रुग्णाच्या उपचाराचा खर्च कुटुंबाला पेलवणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन आमदार सावंत यांनी “गोडगे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मी स्वतः करणार आहे,” असा शब्द दिला. त्यांच्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या गोडगे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संवेदनशीलतेने पुढाकार घेणाऱ्या आमदार सावंत यांच्या भूमिकेचे परिसरातून कौतुक होत आहे. संकटाच्या काळात गरजू कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून उपचारासाठी मदतीचा हात देण्याच्या या निर्णयामुळे जनसेवेची वेगळीच बाजू अधोरेखित झाली आहे.