तुळजाभवानी यात्रेसाठी १० कोटींच्या अनुदानाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराचे विनोद पिंटू गंगणे नगराध्यक्षांकडून आभार
तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर नगरपरिषदेने यात्रेसाठी शासनाकडे १० कोटी रुपयांच्या वाढीव अनुदानाची मागणी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी यात्रा समितीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
नवरात्र महोत्सवासाठी नगरपरिषदेकडून दरवर्षी विविध आवश्यक कामे केली जातात. मात्र शासनाकडून मंजूर होणारे यात्रा कर अनुदान आणि प्रत्यक्ष प्राप्त निधी यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी तफावत असल्याने नगरपरिषदेवर आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे आगामी २०२६च्या यात्रेसाठी आवश्यक खर्चाचा विचार करून १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाकडून मागील वर्षांमध्ये मंजूर झालेल्या अनुदानापेक्षा प्रत्यक्ष प्राप्त निधी कमी राहिल्याने प्रलंबित रक्कम आणि आगामी यात्रेचा वाढता खर्च लक्षात घेता वाढीव निधीची आवश्यकता असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे दाखल होत असल्याने स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासते.
दरम्यान, तुळजाभवानी यात्रेसाठी शासनाकडे अनुदानाची मागणी केल्याबद्दल मा. जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी यात्रा समिती, तुळजापूर यांचे तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी घेत असलेल्या पुढाकाराबद्दलही त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.
“यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा होत आहे. याबद्दल तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार,” अशी भावना नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांनी व्यक्त केली.