ज्ञानसंस्कार तालुकास्तरीय गणित गुणवत्ता शोध परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
लोहारा : विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर करून त्यांच्यात गणित विषयाची आवड, आत्मविश्वास, तर्कशक्ती व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी मिळावी या उद्देशाने ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेस, लोहारा यांच्या वतीने आयोजित “गणिताची भीती दूर करा... गुणवत्तेकडे वाटचाल करा!” या संकल्पनेअंतर्गत तालुकास्तरीय गणित गुणवत्ता शोध परीक्षा–२०२६ घेण्यात आली होती. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, पालकांचा व शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या परीक्षेला लोहारा तालुक्यातील विविध गावांमधून व विविध शाळांमधून जवळपास २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करण्यासोबतच त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील विविध घटकांबरोबरच स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश प्रश्नपत्रिकेत करण्यात आला. सोपे, मध्यम, कठीण व आव्हानात्मक स्वरूपाचे प्रश्न देऊन विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती, तर्कशक्ती, गणितीय विचारशक्ती व समस्या सोडविण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संचालकांचे मनोगत व परीक्षा आयोजनाचा हेतू
यावेळी ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. गणेश गुंड सर यांनी आपल्या मनोगतात परीक्षा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ शालेय परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता त्यांना विविध स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील गुणवत्ता ओळखणे आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसची शैक्षणिक वाटचाल ही केवळ वर्गातील अध्यापनापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या दिशेने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. रसूल शेख सर, शिक्षण विस्ताराधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले.
तसेच श्री. विश्वास ढोबळे सर यांनी परीक्षा आयोजनाबद्दल ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसचे तसेच संचालक प्रा. गणेश गुंड सर यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या गुणवत्तावर्धक परीक्षा व शैक्षणिक उपक्रमांची गरज असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
गुणवंतांचा व पालकांचा सन्मान
कार्यक्रमात तालुकास्तरीय गणित गुणवत्ता शोध परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि पालकांच्या मनात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांचे मनोगत
सत्कारानंतर गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या परीक्षेमुळे आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली, गणिताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या संधीबद्दल ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसचे मनापासून आभार मानले.
पालकांचा विश्वास व्यक्त
पालकांच्या वतीने श्री. सोमनाथ भोंडवे यांनी मनोगत व्यक्त करताना ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचे शैक्षणिक, गुणवत्तावर्धक व प्रेरणादायी उपक्रम राबवावेत, “आम्ही पालक नेहमीच आपल्या पाठीशी राहू,” असा विश्वास त्यांनी सर्व पालकांच्या वतीने व्यक्त केला.
कृतज्ञता
या संपूर्ण उपक्रमासाठी मार्गदर्शन, सहकार्य व प्रोत्साहन देणारे सर्व मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व्यासपीठ, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन आणि त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याचा हा प्रयत्न भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
– प्रा. गणेश गुंड सर
संचालक, ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेस, लोहारा