ध्येय सर्वांगीण विकासाचे, स्वप्न समृद्ध धाराशिवचे!
‘आपला जीव–धाराशिव, व्हिजन २०३०’चा आढावा; शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, ऊर्जा व पायाभूत सुविधांवर प्रशासनाचा भर
धाराशिव : जिल्हा परिषद, धाराशिव येथे आयोजित विशेष आढावा बैठकीत उपस्थित राहून ‘आपला जीव–धाराशिव, व्हिजन २०३०’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आणि योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण, शाश्वत आणि गतीमान विकास साधणे हेच प्रमुख उद्दिष्ट असून, प्रशासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे प्रत्यक्ष गावपातळीवर प्रभावीपणे राबविण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.
प्रत्येक योजनेचा प्रत्यक्ष आणि ठोस परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसून यावा, यासाठी सर्व विभागांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून परिणामाभिमुख आणि वेळेत काम करावे, असे स्पष्ट निर्देश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले.
या बैठकीत जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा या महत्त्वाच्या क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘सायंकाळी ७ ते ९ मोबाईल बंद’ या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील १,०८० शाळांमधील सुमारे ९२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देण्याचे निर्देशही देण्यात आले.
यासोबतच जिल्ह्यात १३ लाख वृक्षलागवड व संवर्धन, सौर ऊर्जेचा प्रचार, क्षयरोगमुक्त जिल्हा मोहीम, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रभावी कचरा व्यवस्थापन तसेच जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा उत्पन्नवर्धक वापर करण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याबाबत प्रशासनाला मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढविताना योजनांची केवळ कागदोपत्री पूर्तता न करता त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.