मोटारसायकल अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मोटारसायकल अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांची धडाकेबाज कारवाई

परंडा : मोटारसायकल अडवून नागरिकांना मारहाण करत रोकड, मोबाईल व सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा परंडा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाणे परंडा गुरनं. ३६२/२०२६ कलम ३०९, ११५(२), ३(५) बीएनएस गुन्ह्यातील गेलेला माल व आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीच्या आधारे सदर गुन्हा मोहा येथील अनिल भिमा पवार याने त्याच्या साथीदारांसह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचून अनिल भिमा पवार याला येडेश्वरी मंदिर ते मलकापूर पाटीकडे मोटारसायकलवर जात असताना थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले.

पोलिसांनी गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या अन्य तीन साथीदारांसह मिळून मागील महिन्यात परंडा हद्दीतील दूधगाव शिवारात एका मोटारसायकलस्वार पुरुष व महिलेला अडवून मारहाण केली. त्यांच्याकडील रोकड, मोबाईल व सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली.

तसेच तीन महिन्यांपूर्वी सोनगिरी शिवारात एका महिलेला अडवून मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले. चोरीचे सोन्याचे दागिने व मोबाईल आरोपीच्या वाटणीला आले होते. ते त्याने मोहा येथील आपल्या राहत्या घरात ठेवले असल्याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिस पथकाने मोहा येथे जाऊन आरोपीच्या घरातून त्याच्या वाटणीला आलेले सोन्याचे दागिने, मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परंडा पोलिस ठाण्यातील जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, चापो/मेहबूब अरव, सुभाष चोरे, प्रकाश बोईनवाड, रणनवरे तसेच आरसीपी पथकातील अंमलदार यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!