हरित धाराशिवचा संकल्प; १० लाखांहून अधिक वृक्षलागवडीचा निर्धार!
स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर ‘हरित धाराशिव अभियान २.०’चा शुभारंभ; लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा जागर
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाची नवी चळवळ सुरू झाली. परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक आणि ‘सह्याद्री देवराई’ हरित चळवळीचे प्रमुख अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत **‘हरित धाराशिव अभियान २.०’**चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील
जिल्हा परिषद सिओ
यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात १० लाखांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन व संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या संदेशातून प्रत्येक भारतीयाला पर्यावरण संवर्धनाशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. आईच्या प्रेमाप्रमाणेच मातृभूमी आणि निसर्गाचे जतन करण्याची भावना या अभियानातून रुजविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेला धाराशिवकरांनी लोकसहभागाची भक्कम साथ दिली आहे. यापूर्वी ‘हरित धाराशिव अभियान १.०’ अंतर्गत १९ जुलै २०२५ रोजी एकाच दिवसात तब्बल १७ लाख १ हजार ८१५ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. या उल्लेखनीय कामगिरीची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली.
विशेष म्हणजे लागवड केलेल्या वृक्षांपैकी ८६.९७ टक्के वृक्षांचे संगोपन यशस्वी झाले. ही केवळ आकडेवारी नसून धाराशिवकरांच्या पर्यावरणप्रेमाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची पावती असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा प्रशासनाचा गौरव करण्यात आला.
आज गरज केवळ झाडे लावण्याची नसून ती जगविण्याची आहे. आपल्या मुलांच्या आणि पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.
एक झाड लावूया... एक भविष्य घडवूया!