वीस वर्षांनंतर प्रभाग क्रमांक १ मध्ये भरला ‘जनता दरबार’; स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर, नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांचे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये तब्बल गेल्या २० वर्षांत प्रथमच ‘जनता दरबार’ भरविण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शहराच्या विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांच्या पुढाकाराने आयोजित या जनता दरबारात नागरिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांचा पाढाच वाचला.
प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक अक्षय जोगदंड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यावेळी रस्त्यांची दुरवस्था, सांडपाणी निचरा, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधांची कमतरता यासह विविध प्रश्न नागरिकांनी थेट नगराध्यक्षांसमोर मांडले.
मात्र या जनता दरबारात सर्वाधिक महत्त्वाचा आणि भावनिक विषय ठरला तो स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, स्मशानभूमीत आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली. या मागणीची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांनी हा प्रश्न प्राधान्याने हाताळला जाईल आणि लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची नोंद करून संबंधित विभागांशी समन्वय साधत टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. प्रभागातील विकासकामांना गती देऊन नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
वीस वर्षांनंतर प्रथमच नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने आणि तातडीने कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.