धाराशिव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक भरतीत SEBC प्रवर्गासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात

धाराशिव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक भरतीत SEBC प्रवर्गासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात

जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

धाराशिव : पवित्र प्रणालीद्वारे होणाऱ्या प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये धाराशिव जिल्ह्यात SEBC प्रवर्गासाठी एकही जागा उपलब्ध नसल्याने या प्रवर्गातील पात्र व गुणवंत उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर, वाशी पंचायत समितीच्या सभापती प्रणिता प्रवीण गायकवाड यांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन SEBC प्रवर्गासाठी नियमानुसार आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात पवित्र प्रणालीद्वारे प्राथमिक शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, EDUCATION OFFICER PRIMARY DHARASHIV (Primary) – Without Interview या पदासाठी एकूण १४५ रिक्त पदे दर्शविण्यात आली आहेत. मात्र आरक्षणनिहाय पदांचा विचार केला असता SEBC प्रवर्गासाठी एकही जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तसेच पवित्र प्रणालीच्या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील अनेक पात्र उमेदवारांनी सहभाग घेतला आहे. या उमेदवारांनी गुणवत्ता व पात्रतेच्या आधारे शिक्षक होण्याची संधी मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे. मात्र SEBC प्रवर्गासाठी जागाच उपलब्ध नसल्याने या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा सौ. तळेकर यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.

“भरती प्रक्रियेतील रिक्त पदांचा आरक्षणनिहाय फेरआढावा घेऊन SEBC प्रवर्गासाठी नियमानुसार आवश्यक जागा निश्चित कराव्यात आणि त्या जागांचा सद्य शिक्षक भरती प्रक्रियेत समावेश करावा. पात्र व गुणवंत उमेदवारांवर अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी मागणी सौ. सविता विकास तळेकर यांनी केली आहे.

तसेच या मागणीची दखल घेऊन शासन स्तरावरही आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी हा प्रश्न संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निवेदनाची माहिती मा. आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब (माजी मंत्री तथा आमदार, भूम-परांडा-वाशी), मा. शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. शिक्षण आयुक्त, मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य तसेच मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांना देण्यात आली आहे.


धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदाळकर यांना लेखी निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य सविता विकास तळेकर वाशी पंचायत समितीच्या सभापती प्रणिता प्रवीण गायकवाड.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!