दरोडा टाकण्याच्या प्रयत्नाचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – सोशल मीडियावरून आरोपींचा माग काढत दोन प्रमुख आरोपी जेरबंद, गुन्ह्यातील एकूण १० आरोपी निष्पन्न
धाराशिव | प्रतिनिधी
दरोडा टाकण्याच्या प्रयत्नाप्रकरणी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत वेगवान, तांत्रिक आणि नियोजनबद्ध तपास करत मोठे यश मिळविले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंचा तसेच गोपनीय माहितीचा आधार घेत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत दोन प्रमुख आरोपींना जेरबंद केले. या तपासादरम्यान केलेल्या चौकशीत या गुन्ह्यातील एकूण १० आरोपी निष्पन्न झाल्याने गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या कारवाईची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
२ ऑगस्ट २०२६ रोजी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील आरोपींवर पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले असता, आरोपींनी पोलिसांना पाहून पथकावर दगडफेक केली व घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी वाशी पोलिस ठाणे येथे गु.र.नं. २८३/२०२६ अन्वये कलम ३१०(४), ३१०(५), १२१, १३२ व ३२४ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाच्या पाहणीत दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे गतिमान केली. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिस निरीक्षक श्री. विनोद इटनवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा लागला. त्यानुसार राम उर्फ बब्या शंकर काळे (वय २३) व सरदार शंकर काळे (वय २८), रा. कन्हेरवाडी, ता. कळंब यांना कन्हेरवाडी शिवारातून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासात या गुन्ह्यातील एकूण १० आरोपी निष्पन्न झाले असून, वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना वाशी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर व अपर पोलिस अधीक्षक सचिन पांढकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. विनोद इटनवार, सपोनि. सुदर्शन कसार, पोहेकॉ. शेख पठन, पोहेकॉ. प्रकाश थिट्टे, पोहेकॉ. जावेद काझी, पोहेकॉ. फरहान पठाण, चापोहे. नागनाथ गुर्वे आणि चापोहे. रत्नदीप डोंगरे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.