आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींसह मान्यवरांची उपस्थिती
धाराशिव | प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील अण्णा भाऊ साठे चौक येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि क्रांतिकारी विचारांच्या माध्यमातून कष्टकरी, श्रमिक, बहुजन आणि वंचित समाजाच्या हक्कासाठी दिलेले योगदान देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सामाजिक समता, स्वाभिमान आणि न्यायाची मूल्ये रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही तितकेच प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नेहा ताई काकडे, श्री. विलास लोंढे, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना उजाळा देत समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश समाजात अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.