आळणीतील वाद पेटला; माजी सरपंचांविरोधात लहुजी शक्ती सेनेचे ठिय्या आंदोलन, निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी

आळणीतील वाद पेटला; माजी सरपंचांविरोधात लहुजी शक्ती सेनेचे ठिय्या आंदोलन, निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी
धाराशिव | प्रतिनिधी
आळणी येथील माजी सरपंच प्रमोद नेताजी वीर यांच्याविरोधात विविध गंभीर आरोप करत लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनात अवैध धंद्यांना संरक्षण, मातंग समाजाला राजकीयदृष्ट्या दुबळे करण्याचा प्रयत्न, समाजात जातीय तेढ निर्माण करणे, खोटी माहिती पसरवून बदनामी करणे तसेच शाळेतील विद्यार्थिनींचा वापर करून प्रशासनावर दबाव आणल्याचे आरोप करण्यात आले. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आळणी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीत सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर मातंग समाजाचे राजकीय नेतृत्व कमकुवत करण्यासाठी नियोजनबद्ध वातावरण तयार करण्यात आले. समाजातील कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला.
यावेळी संबंधित माजी सरपंच कथितरीत्या चालवत असलेल्या "पिंजरा कला केंद्रा"बाबतही गंभीर आरोप करण्यात आले. या कथित व्यवसायामुळे अनेक युवक चुकीच्या मार्गाला लागले, अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले आणि सामाजिक व आर्थिक नुकसान झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या प्रकरणासह संबंधित व्यक्ती व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधातील सर्व कथित प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनासाठी शाळेतील विद्यार्थिनींना आणण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित विद्यार्थिनींना घटनेची माहिती नसतानाही त्यांचा वापर करण्यात आल्याचा दावा करत, यामागील परिस्थितीची तसेच संबंधित शाळेच्या प्रशासनाचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
मातंग समाजातील युवकांना जाणीवपूर्वक गुंड प्रवृत्तीचे असल्याचे चित्र निर्माण करून समाजाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. काही सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असून संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधारांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी असा दावाही केला की, समाजातील काही नेत्यांवर कारवाई करण्यासाठी एका प्रमुख लोकप्रतिनिधीमार्फत पोलीस प्रशासनावर दबाव आणण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
दरम्यान, आंदोलनानंतर लहुजी शक्ती सेनेच्या शिष्टमंडळाने भाजपचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेतली. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि मातंग समाजाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी आमदारांकडे केली. यावर संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका चर्चेदरम्यान मांडण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
लहुजी शक्ती सेनेने इशारा देत म्हटले की, या प्रकरणात तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर मातंग समाजाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!