'विठ्ठलनामाच्या गजरात संत एकनाथ महाराज पालखीचे परंड्यात जल्लोषात स्वागत'
परंडा, दि. १९ जुलै : शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आज परंडा नगरीत भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालखीचे शहरात आगमन होताच संपूर्ण परंडा नगरी विठ्ठलनामाच्या अखंड गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषाने दुमदुमून गेली.
परंडा नगरीचे आराध्य दैवत हजरत ख्वाजा बद्रुद्दीन साब (रहमतुल्लाह अलैह) यांच्या पावन भूमीत संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन हा भाविकांसाठी अविस्मरणीय क्षण ठरला. शहरातील विविध भागांत पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नागरिकांनी दारोदारी उभे राहून पालखीवर पुष्पवृष्टी करत वारकरी भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे विश्वासू शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (आण्णा) साळुंखे, परंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी पालखीचे स्वागत करून वारकरी संप्रदायाप्रती आदर व्यक्त केला.
यावेळी परंडा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी (CO) सौ. मनीषा वडेपल्ली, तहसीलदार निलेश काकडे, युवा सेना शहरप्रमुख वैभव पवार, नगरसेवक शरिफ तांबोळी, नगरसेवक वाजीद दखणी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, वारकरी, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.