कळंबच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडग्याकडे वाटचाल; नव्या जलटाकीच्या स्लॅब कामाची पदाधिकाऱ्यांकडून पाहणी
कळंब, प्रतिनिधी : कळंब शहरातील नागरिकांना भविष्यात मुबलक, नियमित व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कळंब नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या नवीन जलटाकीच्या स्लॅब भरण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान नगर परिषदेचे उपाध्यक्ष लखन गायकवाड, पाणीपुरवठा सभापती भूषण करंजकर तसेच गटनेते हर्षद अंबुरे यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची सविस्तर माहिती घेतली. जलटाकीचे बांधकाम दर्जेदार, सुरक्षित व निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
कळंब शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन ही नवीन जलटाकी उभारली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, अनेक भागांतील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे हे नगर परिषदेचे प्राधान्य असून, विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड न करता दर्जेदार व लोकाभिमुख कामे पूर्ण करण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.