औसा शहरासह परिसरात अवैध मटक्याचे जाळे विस्तारल्याची चर्चा; कारवाईच्या प्रतीक्षेत नागरिक
औसा | प्रतिनिधी
औसा शहरासह परिसरात अवैध मटका व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत असून, शहरातील विविध भागांमध्ये हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. बसस्थानक परिसर, किल्ला परिसर, नगरपरिषद चौक तसेच इतर काही ठिकाणी उघडपणे मटका सुरू असल्याच्या चर्चेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असून अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. झटपट पैशाच्या मोहापायी अनेक बेरोजगार तरुण मटक्याच्या आहारी जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. काही तरुण व्यसनाधीनतेकडे व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याने पालकांमध्येही अस्वस्थता वाढली आहे.
शहरातील प्रमुख चौकांसह काही भागांमध्ये मटक्याचा व्यवहार सुरू असल्याच्या चर्चा होत असताना संबंधित यंत्रणेकडून सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना नेमके कोणाचे अभय आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, अवैध मटका हा केवळ आर्थिक फसवणुकीचा विषय नसून सामाजिक स्वास्थ्याला बाधा पोहोचवणारा प्रकार आहे. कुटुंबांमध्ये वाद, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अस्थिरता वाढण्यास अशा अवैध व्यवसायांचा हातभार लागत असल्याचेही ते सांगतात.