धाराशिवसाठी 7 टीएमसी पाणी योजनेला गती द्या; ₹5,000 कोटींच्या भरीव निधीसह राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची मागणी
सचिन व्ही कदम
मुंबई येथील नंदनवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. ओमप्रकाश (ओमराजे) राजेनिंबाळकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत 7 टीएमसी पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.
खासदार राजेनिंबाळकर यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, धाराशिव हा केंद्र शासनाच्या आकांक्षी जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट असून, सातत्याने दुष्काळ व पाणीटंचाईचा सामना करणारा जिल्हा आहे. शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि सर्वांगीण विकासासाठी कायमस्वरूपी जलस्रोत उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत धाराशिव जिल्ह्यास 7 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची योजना अत्यंत महत्त्वाची असून, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे ₹5,000 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.
त्यामुळे या प्रकल्पाचा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून समावेश करण्यात यावा तसेच केंद्र शासनाच्या आर्थिक सहकार्याने आवश्यक निधी उपलब्ध करून हा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
या योजनेमुळे होणारे प्रमुख फायदे :
* धाराशिव जिल्ह्यास कायमस्वरूपी 7 टीएमसी पाण्याचा स्रोत उपलब्ध होईल.
* हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन कृषी उत्पादनात मोठी वाढ होईल.
* दुष्काळ व पाणीटंचाईच्या समस्येवर प्रभावी उपाय होईल.
* शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून उत्पन्नात भरीव वाढ होईल.
* ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.
* भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व बोअरवेलना वर्षभर पाणी उपलब्ध राहण्यास मदत होईल.
* औद्योगिक विकासाला चालना मिळून नवीन उद्योग व रोजगारनिर्मितीला गती मिळेल.
* ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल.
* जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल.
* भविष्यातील पाणीसंकटावर कायमस्वरूपी उपाययोजना होऊन धाराशिवच्या विकासाला मोठी गती मिळेल.
धाराशिवच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने केंद्र शासनाशी समन्वय साधत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तातडीने तरतूद करून कामाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली.
यावेळी उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी धाराशिव जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत जलसंपदा मंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच 7 टीएमसी पाणीपुरवठा योजना व कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.