धाराशिवच्या केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा; यंदाच सुरू करण्यासाठी निर्णायक हालचाली

धाराशिवच्या केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा; यंदाच सुरू करण्यासाठी निर्णायक हालचाली!

जिल्हा परिषदेने तात्पुरत्या इमारतीसह तीन एकर जागा दिली; कायमस्वरूपी जागेसाठी पाच एकर शासकीय भूखंडाचीही पाहणी — केव्हीएस पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी, अंतिम मंजुरीसाठी युद्धपातळीवर पाठपुरावा

धाराशिव : धाराशिव शहरात केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला आता निर्णायक गती मिळाली असून, याच शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय विद्यालयासाठी आवश्यक असलेली तात्पुरती इमारत आणि कायमस्वरूपी जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली असून, केंद्रीय विद्यालय संघटनेच्या (KVS) पथकाने गुरुवारी धाराशिव येथे उपलब्ध जागा व इतर अनुषंगिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली.

धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेत जागेचा प्रश्न हा सर्वात मोठा अडथळा ठरत होता. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर सौ. अर्चना पाटील यांनी या प्रश्नावर ठोस पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या मालकीची डीआयसी रस्त्यावरील डायटसमोरील सुसज्ज इमारत केंद्रीय विद्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव त्यांनी पुढे आणला. या इमारतीमध्ये २५ वर्गखोल्या, ग्रंथालय, सुसज्ज सभागृह आणि पार्किंगसह सुमारे तीन एकर जागा उपलब्ध आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाने या इमारतीचा केंद्रीय विद्यालयासाठी वापर करण्यास मंजुरी दिल्याने विद्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला मोठी गती मिळाली आहे.

दरम्यान, केंद्रीय विद्यालयासाठी कायमस्वरूपी आणि सर्व सुविधांनी युक्त जागा उपलब्ध व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसाहतीमागील गट क्रमांक ४२६ मधील सुमारे पाच एकर शासकीय जागा केंद्रीय विद्यालयासाठी योग्य असल्याचे सौ. अर्चना पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. या जागेसंदर्भातील आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. त्यानुसार धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय विद्यालय संघटनेशी अधिकृत पत्रव्यवहार केला. त्याच अनुषंगाने गुरुवारी केव्हीएसच्या पथकाने संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सौ. अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत केंद्रीय विद्यालय संघटनेच्या पथकासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या वतीने सौ. अर्चना पाटील यांनी पथकाचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय बाबी, जागेची अंतिम मंजुरी, इमारत, शैक्षणिक सुविधा तसेच पुढील प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली.

यंदापासूनच विद्यालय सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा

धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार केंद्रीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी याच वर्षापासून केंद्रीय विद्यालय सुरू व्हावे, यासाठी संबंधित सर्व विभागांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. केंद्रीय विद्यालयाची मान्यता, जागेची अंतिम मंजुरी आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा सुरू आहे. कोणत्याही कारणामुळे प्रक्रियेला विलंब होऊ नये, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अंतिम मान्यता मिळेपर्यंत हा पाठपुरावा आणखी वेगाने सुरू राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

धाराशिवच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे नवे दालन खुले करण्याच्या दिशेने केंद्रीय विद्यालयाचा हा निर्णायक टप्पा मानला जात असून, यंदापासूनच विद्यालय सुरू होण्याच्या आशा आता बळावल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!