‘एआय’सोबत मानवी कौशल्यांनाही भविष्यात महत्त्व : आनंद पाटील
लोहारा : शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लोहारा येथे आयोजित करण्यात आलेल्या शंकरराव जावळे पाटील आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे विचार ऐकले.
‘एआय आणि आपले भविष्य’ या विषयावर विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानासोबत निर्माण होणाऱ्या नव्या संधी, आव्हाने आणि भविष्यातील बदलांवर प्रभावीपणे आपले विचार मांडले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि सकारात्मक वापर करताना मानवी कौशल्ये, सर्जनशीलता, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
यावेळी आनंद पाटील म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील मोठी शक्ती आहे. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी बुद्धिमत्ता, कौशल्ये आणि संवेदनशीलता यांची सांगड घालणे तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाला घाबरून न जाता त्याचा अभ्यास करून नव्या संधींचा उपयोग करून घ्यावा.
विद्यार्थ्यांनी केलेली अभ्यासपूर्ण व प्रभावी मांडणी निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी प्राध्यापक शेषेरावजी नाना जावळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.