शिक्षकांच्या मागण्यांसाठी अर्चनाताई पाटील मैदानात; उपोषणस्थळी भेट देत दिले ठोस पाठपुराव्याचे आश्वासन
बेमुदत साखळी उपोषणातील आंदोलनकर्त्या शिक्षकांशी जिल्हा परिषद अध्यक्षांचा थेट संवाद; न्याय्य मागण्यांची गांभीर्याने दखल
धाराशिव : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्न व मागण्या सविस्तरपणे जाणून घेत त्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेतली.
शिक्षकांनी मांडलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित विषयांची नियम व कायदेशीर तरतुदींनुसार तपासणी करण्यात येईल. तसेच शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सकारात्मक व ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन अर्चनाताई पाटील यांनी यावेळी दिले.
शिक्षकांच्या प्रश्नांकडे केवळ एक मागणी म्हणून न पाहता, शिक्षणव्यवस्थेच्या भविष्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, अशी भूमिका जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केली. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांबाबत संबंधित स्तरावर योग्य ती चर्चा करून त्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.