धाराशिव जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर; तातडीने दुष्काळ जाहीर करा. माजी मंत्री तानाजीराव सावंत

धाराशिव जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर; तातडीने दुष्काळ जाहीर करा 

 ( सय्यद कलीम मुसा.)

तानाजीराव सावंत यांची राज्य सरकारकडे मागणी; शेतकरी, पशुधनासाठी तात्काळ मदतीची अपेक्षा

धाराशिव : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान होण्याबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात तातडीने विशेष सर्वेक्षण करून पंचनामे करावेत आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

जिल्ह्यातील सद्यस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांकडे सविस्तर निवेदन पाठवून शेतकरी व ग्रामीण जनतेला दिलासा देण्याची मागणी केली आहे.

पावसाअभावी केवळ शेतीचे नुकसान होत नसून ग्रामीण भागातील भूजलपातळी खालावत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी शासनाने ठोस निर्णय घेऊन मदतकार्याला गती द्यावी, अशी भूमिका सावंत यांनी मांडली.

शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, कर्जवसुलीला स्थगितीची मागणी

जिल्ह्यात पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना थेट पीक नुकसानभरपाई व दुष्काळी अनुदान देण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पीक विम्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांना विलंब न करता मिळावी यासाठी विशेष प्रशासकीय मोहीम राबवावी, असेही सावंत यांनी निवेदनात नमूद केले आहे.

चारा छावण्या व टँकरची मागणी

पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याची तयारी करावी, तसेच रोजगाराची गरज असलेल्या ग्रामीण भागात ‘मनरेगा’ची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे-खते उपलब्ध करून देण्याबरोबरच जिल्ह्यासाठी विशेष दुष्काळी आर्थिक पॅकेज जाहीर करावे. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व ग्रामीण जनतेला शासनाने कोणताही विलंब न करता प्रशासकीय आणि आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तानाजीराव सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!