धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई!
पवनचक्कीचे साहित्य चोरणाऱ्या सराईत टोळीच्या आवळल्या मुसक्या; चार आरोपी जेरबंद, ४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई करत पवनचक्कीचे साहित्य चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अणदूरजवळील शिवरातील फॉरेस्ट परिसरात सापळा रचून पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी धाराशिवसह इतर जिल्ह्यांतील पवनचक्की साहित्य चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार गुन्हे उघडकीस आणले.
अटकेत असलेल्या आरोपींमध्ये अनिल लामा काळे (वय ४०, रा. मस्सा), नंदू रामा शिंदे (रा. खामकरवाडी), बबलू उर्फ राम शिवाजी शिंदे (वय २९, रा. खामकरवाडी) आणि शाम उर्फ बाबा शंकर शिंदे (वय २८, रा. खामकरवाडी) यांचा समावेश आहे.
पोलिस तपासात आरोपींनी खामकरवाडी येथील नव्या बांधकामाच्या ठिकाणी चोरीचे साहित्य लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथून कॉपर केबल, कॉपर रॉड, तारा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रेखा खरे व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इंगळेवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, निलेश जाधव, दत्तात्रय गाडेकर तसेच पोलीस नाईक बबन जाधव, पुष्कर मुठाळे, चापोळे, महिबूब अरब, प्रकाश बोडीबावडे आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पवनचक्की साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचे कंबरडे मोडले असून, जिल्ह्यातील अशा गुन्हेगारांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.