धाराशिवला अत्याधुनिक स्वयंचलित वाहन परीक्षण केंद्राची भेट; वाहन तपासणीला मिळणार तंत्रज्ञानाची नवी दिशा
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शहरात अत्याधुनिक स्वयंचलित वाहन परीक्षण केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या समारंभाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी धाराशिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डाके, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वयंचलित वाहन परीक्षण केंद्राच्या माध्यमातून वाहनांची तपासणी आता पूर्णपणे तंत्रज्ञानाधारित, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे. मानवी हस्तक्षेप कमी करून आधुनिक यंत्रणेद्वारे वाहनांच्या तांत्रिक स्थितीचे परीक्षण होणार असल्याने तपासणी प्रक्रियेत अधिक विश्वासार्हता येणार आहे.
वाहनधारकांना जलद, सुलभ आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यास या केंद्राची मोठी मदत होणार आहे. तसेच रस्ते सुरक्षेला बळकटी देणे, प्रदूषण नियंत्रणास हातभार लावणे आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाहनांनाच रस्त्यावर परवानगी मिळावी, या उद्देशाने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवहन विभागाच्या सेवांमध्ये होत असलेल्या बदलांचे स्वागत करत, नागरिकांना अधिक पारदर्शक व कार्यक्षम सेवा देण्याच्या दृष्टीने हे केंद्र मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
