पालकमंत्र्यांशी मल्हारदादा पाटील यांची विकासावर निर्णायक चर्चा; धाराशिवच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्यावर भर
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्याचे युवा नेतृत्व मल्हारदादा पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांची सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर यावेळी सकारात्मक विचारविनिमय झाला.
या भेटीत रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास तसेच विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
मल्हारदादा पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न पालकमंत्र्यांसमोर मांडत, प्रलंबित कामे लवकर मार्गी लागावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांनीही विकासकामांना प्राधान्य देत प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक त्या बाबींवर सकारात्मक कार्यवाही करण्याची भूमिका व्यक्त केल्याचे समजते.
धाराशिवच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे युवा नेतृत्व म्हणून मल्हारदादा पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची चर्चा या भेटीनंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळावी, हीच या भेटीमागील प्रमुख भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
