दैनिक त्रिशक्ती | बातमी विशेष
पहाटेची धाव आई तुळजाभवानीच्या चरणी!
खासदार ओमराजे निंबाळकर यांची २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन; शेतकरी संकटातून सावरण्यासाठी तुळजाभवानी मातेला साकडे!
धाराशिव | प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पहाटेच्या सुमारास आरोग्य, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडवून आणला. धाराशिव हाफ मॅरेथॉन टीमसोबत त्यांनी पहाटे ५ वाजता धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तुळजाभवानी मंदिरापर्यंत तब्बल २१ किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण केले.
धावण्याच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देतानाच महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा उपक्रम विशेष ठरला. मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मित्रपरिवारासह आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
सध्या दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी बांधवांसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, शेतीसमोरील आव्हाने आणि बळीराजाची चिंता लक्षात घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी, त्यांना संकटावर मात करण्याचे बळ मिळावे आणि राज्यातील शेतकरी बांधवांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना आई तुळजाभवानी मातेच्या चरणी केली.
श्रद्धा, आरोग्य आणि शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता!
२१ किलोमीटरच्या या पहाटेच्या धावण्याने शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले, तर तुळजाभवानी मातेच्या दर्शनातून शेतकऱ्यांच्या संकटाबाबतची आस्था व्यक्त झाली. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून आरोग्याची जपणूक आणि बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना, असा सकारात्मक संदेश देण्यात आला.