पाणीटंचाईवरून शिवसेना आक्रमक!तांदुळवाडीत तातडीने टँकर सुरू करा, पारगावची रखडलेली पाइपलाइन पूर्ण करा; अन्यथा १५ नोव्हेंबरला बीड–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको!

पाणीटंचाईवरून शिवसेना आक्रमक!
तांदुळवाडीत तातडीने टँकर सुरू करा, पारगावची रखडलेली पाइपलाइन पूर्ण करा; अन्यथा १५ नोव्हेंबरला बीड–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको!
जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता तळेकर यांचा जिल्हा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
पारगाव, प्रतिनिधी : पारगाव जिल्हा परिषद गटातील २१ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तांदुळवाडी येथे तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत आणि पारगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेले १६०० मीटर पाइपलाइनचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी ठाम मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद प्रशासन, वाशी तहसील कार्यालय आणि पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकीकडे नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असताना प्रशासनाकडून विलंब होत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाला पाच ठोस मागण्या
तांदुळवाडी येथे तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत, पारगावची १६०० मीटरची अपूर्ण पाइपलाइन युद्धपातळीवर पूर्ण करावी, पाणीटंचाईग्रस्त २१ गावांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, उपलब्ध निधीचा नियमानुसार तातडीने विनियोग करावा आणि मागील तीन महिन्यांतील कार्यवाहीचा अहवाल द्यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
१५ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा
“नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसेल, तर नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल,” अशी भूमिका सौ. सविता तळेकर यांनी मांडली आहे.
प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून तांदुळवाडीत टँकर सुरू करावेत आणि पारगावची रखडलेली पाइपलाइन पूर्ण करावी. अन्यथा, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी बीड–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.
आता जिल्हा प्रशासन या गंभीर पाणीप्रश्नावर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे पारगाव गटातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सौ. सविता विकास तळेकर
जिल्हा परिषद सदस्या, धाराशिव — पारगाव

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!