भैरवनाथ शुगर वर्क्सच्या १९व्या गळीत हंगामाचा शुभारंभबॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन उत्साहात;

भैरवनाथ शुगर वर्क्सच्या १९व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन उत्साहात; शेतकऱ्यांना यंदा अधिक ऊसदर देण्याचा कारखाना प्रशासनाचा निर्धार
वाशी (ता. वाशी) : भैरवनाथ शुगर वर्क्स लि., वाशी (तांदुळवाडी) कारखान्याच्या १९व्या गळीत हंगाम २०२६-२७ च्या बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन समारंभ गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कारखान्याचे चेअरमन अनिल (दादा) सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम (केशव) सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (अण्णा) साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांजुळे यांनी केले. यावेळी भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हाईस चेअरमन विक्रम (केशव) सावंत यांनी कारखान्याच्या वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले. भैरवनाथ-शिवशक्ती साखर उद्योग समूह हा सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे समाधानकारक गाळप करीत असून प्रत्येक सभासदांच्या उसाला योग्य दर देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. मागील १२ वर्षांपासून शेतकऱ्यांना विक्रमी भाव देण्यात येत असून यापुढेही ही परंपरा कायम ठेवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इंदापूर येथील नरसिंह साखर कारखाना भैरवनाथ शुगर वर्क्सच्या माध्यमातून तसेच आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनातून बॉयलर व मोळी पूजन समारंभ संपन्न झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दोन्ही कारखान्यांच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाचे जास्तीत जास्त गाळप करून विक्रमी भाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
यंदाच्या तुटवड्याच्या परिस्थितीतही भैरवनाथ साखर उद्योग समूह शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे चेअरमन अनिल (दादा) सावंत यांनी सांगितले. वाशी तालुक्यात उसाची परिस्थिती चांगली असून जास्तीत जास्त ऊस भैरवनाथ शुगर वर्क्सला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अतिरिक्त ऊस झाल्यास तो परत पाठविण्याऐवजी परिसरातील इतर कारखान्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उसाला जास्तीत जास्त दर देण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची शंका बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (अण्णा) साळुंके यांनी वाशी तालुक्यातील इंदापूर व वाशी साखर कारखान्यांच्या नियोजनाचे कौतुक केले. भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हाईस चेअरमन विक्रम (केशव) सावंत अत्यंत उत्कृष्टपणे काम करीत असून परिसरातील प्रामाणिक शेतकऱ्यांना भैरवनाथ शुगर वर्क्सला ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास वाशी तालुकाप्रमुख अॅड. सत्यवान गमारे, तेरखेडा जिल्हा परिषद सदस्य विक्की चव्हाण, विकास तळेकर, नागनाथ नाईकवाडी, शिवहार स्वामी, सतीश शेरकर, प्रकाश शेटे, सुनील जाधवर, उद्धव घोलप, सौ. अलकाताई भाळेर, प्रवीण गायकवाड, नितीन रणदिवे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वहातूक ठेकेदार, कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना युवासेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब मांजुळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिवहार स्वामी यांनी मानले.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य
विक्रमी गाळप, योग्य ऊसदर आणि शेतकऱ्यांना वेळेवर सहकार्य देण्याचा निर्धार; १९व्या गळीत हंगामासाठी भैरवनाथ शुगर वर्क्स सज्ज

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!