बोमनाळीत तिरट जुगारावर पोलिसांची धाड; २.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

बोमनाळीत तिरट जुगारावर पोलिसांची धाड; २.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
तीन जण ताब्यात; एक संशयित अंधाराचा फायदा घेत पसार — चार दुचाकींसह रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत
बोमनाळी, ता. मुखेड | प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील बोमनाळी येथील नवीन आबादी परिसरात तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुखेड पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत तीन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि चार दुचाकी असा एकूण २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस नोंदीनुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.५४ वाजता पोलीस निरीक्षक कामठेवाड यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गणेशराव चुतुरवाड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ गित्ते (ब.नं. १६५७), पोकाॅ इत्तिवार (ब.नं. ४०१) आणि पोकाॅ फत्ताडे (ब.नं. १४२) हे ग्रामीण बिटमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेण्यासाठी रवाना झाले होते.
यावेळी बोमनाळी फाटा परिसरात मिळालेल्या माहितीनुसार, नवीन आबादी येथील संभाजी माणिका घोडके यांच्या किराणा दुकानासमोरील मेन रोडवर काही जण गोलाकार बसून तिरट जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पंचांसह पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १२.१५ वाजता संबंधित ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना पाहताच जुगार खेळणारे काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यापैकी बालाजी मनोहर गोजेगावे, गणेश जयवंता मोरे आणि गोपाळ गुडांजी मोरे, तिघेही रा. बोमनाळी, ता. मुखेड, जि. नांदेड, यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बारक्या गंगाधर घोडके याच्यासह अन्य काही जण अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
चार दुचाकींसह रोकड जप्त
कारवाईदरम्यान तिघांकडून रोख रक्कम व तिरट जुगारातील पत्ते मिळून आले. तसेच घटनास्थळाजवळ उभ्या असलेल्या चार दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली. जप्त मुद्देमालात रोकड, ४३ पत्ते आणि चार दुचाकींचा समावेश असून एकूण किंमत २ लाख १४ हजार ५०० रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १२(अ) अन्वये कारवाई करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास मुखेड पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!