मृत्यूचा सापळा की विकासकाम? जुना उपळा रोडवरील उघड्या खड्ड्यावर नागरिकांचा संताप; 'आणखी किती बळींची वाट पाहताय?',
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शहरातील जुना उपळा रोड परिसरात सर्व्हिस रोड संपताच सुमारे पाच ते सहा फूट खोल असलेला उघडा खड्डा नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. या खड्ड्यावर संरक्षणासाठी स्लॅब टाकण्यात आलेला नसून, आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचाही अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात "या या खड्ड्यात पडायला या... मला अजून एक बळी पाहिजे, त्याशिवाय माझे समाधान होणार नाही... आपलाच धाराशिवचा लाडका गुत्तेदार" अशा आशयाचे फलक लावून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दीड वर्षांपूर्वी याच परिसरात पोदार शाळेतील एका विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी सुरक्षिततेबाबत आश्वासने देण्यात आली; मात्र आजही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
सर्व्हिस रोड संपताच समोर येणारा हा खोल खड्डा, त्यावर स्लॅब नसणे, तसेच पुरेशी बॅरिकेडिंग, इशारा फलक आणि प्रकाशव्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. "आणखी किती निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?", "संबंधित ठेकेदाराला नियमांचे पालन न करण्याची मोकळीक कोणी दिली?" असे प्रश्न संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक निधीतून होणारी विकासकामे ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असतात; मात्र अपूर्ण कामे, निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागतात. त्यामुळे संबंधित कामाची गुणवत्ता, कामाची देखरेख आणि सुरक्षा नियमांचे पालन याबाबत सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
याशिवाय, पुढील १५ दिवसांत हा धोकादायक खड्डा सुरक्षित करून रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही, तर नागरिकांच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने सर्व्हिस रोड फोडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
धाराशिवकरांच्या मते, ही केवळ एका रस्त्याची समस्या नसून नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर बाब आहे. त्यामुळे कोणतीही पुढील दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक सुरक्षितता उपाययोजना कराव्यात आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.