घाटपिंपरी शिवारात वाघाची दहशत; गायीची शिकार करून २०० मीटर फरफटत नेले!

घाटपिंपरी शिवारात वाघाची दहशत; गायीची शिकार करून २०० मीटर फरफटत नेले!
गेल्या वर्षीही याच परिसरात गोठ्यात गायीची शिकार; वनविभागाच्या तपासणीत वाघाच्या ठशांची पुष्टी — आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची तातडीने दखल
वाशी : तालुक्यातील घाटपिंपरी शिवारात वाघाने शेतकरी श्री. बालाजी भरत निकत यांच्या गायीची शिकार करून तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याची भीषण घटना घडली आहे. या घटनेमुळे घाटपिंपरी परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही घाटपिंपरी शिवारातील गोठ्यात याच वाघाने गायीची शिकार केल्याची घटना घडली होती. त्यावेळी घटनास्थळी आढळलेले ठसे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासून ते वाघाचेच असल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा त्याच परिसरात गायीची शिकार झाल्याने वन्यप्राण्यांचा वावर आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, सद्य घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासणी केली असता, घटनास्थळी आढळलेले ठसे वाघाचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये अधिकच चिंता निर्माण झाली आहे.
या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांनी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला. परिसरातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या गाईंचे त्वरित पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश वनविभाग प्रशासनाला दिले.
तसेच, वाघाचा वावर लक्षात घेता शेतकऱ्यांनी व नागरिकांनी शेतात जाताना स्वतःच्या सुरक्षेसह पशुधनाचीही योग्य ती काळजी घ्यावी. शक्यतो एकट्याने शेतात न जाता समूहाने जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
घाटपिंपरी परिसरात वारंवार वाघाचा वावर आढळून येत असल्याने वनविभागाने केवळ पंचनामे न करता वाघाचा तातडीने शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा आणि शेतकरी व पशुधनाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!