पशुधनाचा विमा काढा; शासनाकडून मिळवा ८५ टक्के अनुदान!

पशुधनाचा विमा काढा; शासनाकडून मिळवा ८५ टक्के अनुदान!

पशुपालकांसाठी मोठी संधी; जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

धाराशिव : शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनाला नैसर्गिक आपत्ती, अपघात तसेच अन्य कारणांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावे, यासाठी पशुधन विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या ८५ टक्के रकमेचे शासनाकडून अनुदान मिळत असून, पशुपालकांना केवळ १५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी आपल्या पशुधनाचा विमा काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

गाय-म्हैसपासून शेळी-मेंढीपर्यंत विमा संरक्षण

योजनेअंतर्गत विविध पशुधनासाठी कमाल विमा संरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दुभती गाय ७० हजार रुपये, दुभती म्हैस ८० हजार रुपये, बैल ७० हजार रुपये आणि रेडा ८० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते. तसेच शेळी व मेंढीसाठी प्रत्येकी ७ हजार रुपये विमा संरक्षणाची तरतूद आहे. एका कुटुंबातील जास्तीत जास्त १० पशुधनासाठी अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

विमा हप्त्यात शासनाचा ८५ टक्के वाटा

विमा कालावधीनुसार प्रीमियमचे दर निश्चित करण्यात आले आहेत. एक वर्षासाठी ४.३० टक्के, दोन वर्षांसाठी ७.४० टक्के आणि तीन वर्षांसाठी १०.४० टक्के प्रीमियम दर लागू आहेत.

उदाहरणार्थ, ७० हजार रुपये विमा संरक्षण असलेल्या संकरित गाईसाठी एक वर्षाचा विमा हप्ता ३,०१० रुपये असून, त्यातील पशुपालकाचा १५ टक्के हिस्सा केवळ ४५१.५० रुपये इतका आहे. उर्वरित रक्कम शासनाच्या अनुदानातून भरली जाते.

मोबाईलवरूनही नोंदणीची सुविधा

पशुधन विमा योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी SARUS मोबाईल ॲपचा वापर करता येणार आहे. हे ॲप Google Play वर उपलब्ध असून, त्याचे डेव्हलपर Agriculture Insurance Company of India Limited (AIC) आहेत. या माध्यमातून शेतकरी व संबंधित विमा उत्पादनांसाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

‘No Tag, No Claim’; UID व NDLM नोंदणी आवश्यक

विमा योजनेत पशुधनाची ओळख निश्चित करण्यासाठी भारत पशुधन प्रणाली (NDLM) वर नोंदणी तसेच पशुधनाला १२ अंकी UID/Ear Tag असणे आवश्यक आहे. विमा कंपनीकडून UID सोबत RFID तंत्रज्ञानाचाही वापर केला जाऊ शकतो.

‘No Tag, No Claim’ या नियमानुसार टॅग नसलेल्या पशुधनाचा विमा दावा ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे विमा काढण्यापूर्वी पशुपालकांनी पशुधनाची ओळख व टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

जनावर दगावल्यास तातडीने विमा कंपनीशी संपर्क

विमाधारक पशुधनाचा मृत्यू झाल्यास पशुपालकांनी विलंब न करता संबंधित विमा कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर १९६२ किंवा ९०६३१४२२९९ वर संपर्क साधावा. त्यानंतर नियमानुसार पशुवैद्यकीय तपासणी, पोस्टमॉर्टेम व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

दावा मंजूर झाल्यानंतर १५ दिवसांत रक्कम खात्यात

विमा दावा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व पोस्टमॉर्टेम अहवाल प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत पात्र विमा रक्कम पशुपालकाच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा करण्याची तरतूद आहे.

महत्त्वाचे म्हणजे, जनावर दगावल्यास मृत जनावराची विल्हेवाट लावण्यापूर्वी विमा कंपनी अथवा संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी, जेणेकरून विमा दावा प्रक्रियेत अडचणी निर्माण होणार नाहीत.

आर्थिक जोखमीपासून पशुधनाचे संरक्षण करा

पशुधन हे शेतकरी व पशुपालकांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असल्याने अचानक उद्भवणाऱ्या दुर्घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत पशुधन विमा योजना आर्थिक आधार देणारी ठरू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांनी केवळ १५ टक्के हिस्सा भरून शासनाच्या ८५ टक्के अनुदानाचा लाभ घ्यावा आणि आपल्या पशुधनाला विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

— माहिती व प्रसिद्धी कक्ष, जिल्हा परिषद धाराशिव

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!